पिंपरी : ‘टेंडर’मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटे यांची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने जागे झालेल्या लोकांच्या मताने विकासाची गंगा आणायचे काम राहुल यांच्याकडून केले जाईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे त्यांना एकदा संधी द्या, अशी भावनिक साद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (ता. १४) वाल्हेकरवाडी येथील सभेत चिंचवडच्या मतदारांना घातली.
महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी उमेदवार राहुल कलाटे, माजी खासदार विदुरा ऊर्फ नाना नवले, कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे, पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, नवनाथ जगताप, मयूर कलाटे, सुनील गव्हाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे, तुकाराम भोंडवे, गणेश भोंडवे, नवनाथ जगताप, मयूर कलाटे, मच्छिंद्र तापकीर, संपत पवार, देवेंद्र तायडे, सायली नढे, ज्योती निंबाळकर, इम्रान शेख, अनिता तुतारे, वैशाली मराठे, सागर तापकीर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘लोकसभेनंतर महाराष्ट्र कोण चालवणार हा निकाल आता आपल्याला द्यायचा आहे. एके काळी महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होते. ठराविक लोकांच्या हातात सत्ता आली आणि चित्र बदललं. अण्णासाहेब मगर, डॉ. श्री. श्री. घारे आदी नेत्यांनी आपल्या भागाला चेहरा दिला. पण; आज ते चित्र राहिलं नाही. शहर व परिसरात उद्योगधंदे वाढवले. हिंजवडीत आयटी पार्क आणले. हजारो लोकांना काम दिले. पण; आज जमेच्या बाजू नाही, नुकसानीच्या बाजू दिसतात. शहराचा चेहरा दिवसेंदिवस खराब होत आहे. मूलभूत सुविधांची पूर्तता होत नाही, असे चित्र आहे.’’
पिंपरी, चिंचवड विधानसभेचा ६० टक्के भाग माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात होता. अलीकडे माझा संपर्क कमी झाला आहे. मूलभूत गरजा, पाणी, वीज, स्वच्छता, पायाभूत सुविधा याबाबत गेल्या दहा वर्षात हवे तसे काम झाले नाही. आयटी कंपन्यांसाठी हिंजवडी आणि चिंचवडचे नाव होते. मात्र, आज ३०-३५ प्रसिद्ध कंपन्या येथून निघून गेल्या. हजारो लोकांच्या हाताचे काम गेले. गेले दहा वर्ष सत्ता असलेल्या लोकांनी सत्तेचा विनियोग तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी केला नाही. त्यासाठी सत्तेमध्ये बदल करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आप आदी सर्वांनी ठरवले आहे, की सत्ता परिवर्तन करायचे. त्यासाठी राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली आहे, असे पवार यांनी नमूद केले.
राहुल कलाटे म्हणाले...
शहराचे दोन भाग करून, सत्ता वाटून घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली.
खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना कोणाची हे दाखविण्याची वेळ आली.
शरद पवार यांच्या बाजूने प्रचंड जनमत
राज्यात सत्ता परिवर्तन करणारी ही निवडणूक
शरद पवार यांच्या माध्यमातून या शहराला पुन्हा नावलौकीक मिळवून देवू.
वाकड, पुनावळे, ताथवडे भागातील १८ रस्त्यांची कामे सत्ताधारी भाजपने अडविली होती.
महाविकास आघाडीच्या सरकारने ती मंजूर केली.
प्राधिकरणावर साडेबारा टक्के परतावा शेतकऱ्यांना मिळवून देवू.
प्राधिकरणातील घरे लोकांच्या नावावर करून देवू.
पूररेषेतील घरांचा प्रश्न कायमचा मार्गी लावू
पुनावळेत कचरा डेपोच्या जागेवर जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची वारंवार मागणी केली.
राहुल यांना संधी दिल्यास पुन्हा सोन्याचे दिवस आणतो
राहुल यांना महापालिकेचा अनुभव आहे. नागरी प्रश्नांचा त्यांचा अभ्यास उत्तम आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यामुळे लोकांच्या समस्या सोडविण्याची दृष्टी असलेल्या राहुल कलाटे यांना आपण विधानसभेची एकदा संधी द्या. या उद्योगनगरीला पुन्हा सोन्याचे दिवस दाखविल्याशिवाय मी राहणार नाही, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
#ElectionWithSakal