भोसरी, ता. १५ ः बदलत्या जीवनशैली, व्यायामाचा अभाव, स्मार्टफोनचा अतिवापर, कामाचा ताण-तणाव, यामुळे देशामध्ये मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांमध्ये मधुमेहाचे वाढत चाललेले प्रमाण धोकादायक असल्याचे मत मधुमेही तज्ज्ञ प्रा. डॉ. अनु गायकवाड यांनी भोसरीत व्यक्त केले.
जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉ. गायकवाड डायबेटिस सेंटर व लायन्स क्लब भोजपुर गोल्डद्वारे आयोजित मोफत मधुमेह तपासणी शिबिरामध्ये ते बोलत होते. या वेळी शंभरहून अधिक नागरिकांची रक्त शर्करा, मागील तीन महिन्यांची सरासरी एचबीएसी, रक्तदाब, हृदय, बीएमआय, पायांच्या नसा आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. या वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष जीवन सोमवंशी, सचिव मुरलीधर साठे, मुकुंद आवटे, सुदाम भोरे, डॉ. दीपाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महाजन व मुलाणी यांना मधुमेह विजेता पुरस्कार
या वर्षीचा मधुमेह विजेता पुरस्कार भगवान महाजन व शेहनाज मुलाणी यांना देण्यात आला. या पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह, ग्लुकोमीटर आणि संत तुकाराम महाराजांची गाथा देण्यात आली. विजेत्यांना वर्षभर मधुमेहासाठी लागणारी औषधे मोफत देण्याबरोबरच आजीवन मधुमेह विजेत्याला डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन मोफत देण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. अभिषेक गायकवाड, दशरथ चौधरी, आदित्य शेळके, सोनू गव्हाणे, राजेभाऊ खेत्री आदींनी परिश्रम घेतले. डॉ. शंकर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. जीवन सोमवंशी यांनी आभार मानले.