DIY Face pack: सुंदर आणि चमकदार त्वचा कोणाला नको हवी असते? प्रत्येक महिला आपला चेहरा गुलाबी आणि मुलायम ठेवण्याचा प्रयत्न करत असते, आणि त्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले जातात. ज्यामध्ये DIY फेस पॅकचा देखील वापर केला जातो. अशाच एक फेस पॅकबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. तो म्हणजे झेंडूच्या फुलांचा फेस पॅक! चमकदार आणि डागविरहित त्वचेसोबतच, वृद्धत्वाची लक्षणे देखील झेंडूच्या फेस पॅक लावल्याने दूर होऊ शकतात. तर जाणून घेऊया त्याच्याबद्दल सविस्तर.
चमकदार त्वचेसाठी DIY झेंडूचा फेसपॅक
झेंडूची फुले पूजेत आणि सजावटीमध्ये वापरण्यासोबतच तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठीही वापरू शकता. झेंडूच्या फुलांपासून बनवलेल्या फेस पॅकने त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. झेंडूच्या फुलांमध्ये असलेले घटक त्वचेला तेलमुक्त करतात आणि वृद्धत्वाची समस्याही दूर करू शकतात. यामुळे डाग आणि मुरूमदेखील दूर होतात.
चला तर मग, झेंडूचा फेसपॅक बनविण्याच्या पद्धती आणि ते चेहऱ्यावर कसे लावायचे याची माहिती तसेच त्याचे फायदे काय आहेत याबद्दल जाणून घेऊया.
तांदूळ पीठ आणि झेंडूचा फेसपॅक
झेंडूच्या फुलांमध्ये खोबरेल तेल मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि नंतर त्यात तांदळाचे पीठ आणि लिंबाचा रस घालून फेस पॅक तयार करा. हा पॅक संपूर्ण चेहरा आणि मानेवर 10 ते 12 मिनिटांसाठी लावा, आणि त्यांनंतर धुवून टाका. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातील आणि त्वचा डागरहित आणि चमकदार होईल.
बेसन, कच्चे दूध आणि झेंडूचा फेसपॅक
ताबडतोब चमकदार त्वचा हवी असल्यास झेंडूच्या फुलांमध्ये खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा आणि नंतर त्यात बेसन आणि कच्चे दूध घालून फेस पॅक तयार करा. त्यानंतर हा पॅक संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. 10-15 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेस पॅक लावल्याने त्वचेचा टोन सुधारेल आणि त्वचेची चमक वाढेल.
झेंडूची फुले आणि मधाचा फेसपॅक
झेंडूची फुले बारीक करून त्यात मध घालून संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. 10-15 मिनिटांनी धुवा. हा फेस पॅक लावल्याने वृद्धत्वाची समस्या दूर होईल आणि टॅनिंगपासूनही सुटका मिळेल. झेंडूच्या फुलांमध्ये अँटीसेप्टिक, अँटीफंगल गुणधर्म असतात, जे त्वचेवर मुरुम येण्यापासून रोखतात. यापासून बनवलेला फेसपॅक लावल्याने मुरुमांची समस्या उद्भवत नाही.
सूचना: वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहे, हा कोणत्याही वैद्यकीय मताचा पर्याय नाही. त्यामुळे त्वचेसंबंधित काही समस्या असेल तर वरील टिप्सचा अवलंब करण्यापूर्वी पॅच टेस्टिंग आवर्जून करा, तसेच काही समस्या असल्यास त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घ्या