सोमेश्वरनगर, ता. १५ : तुळशीच्या लग्नानंतर वेध लागतात ते घरातील उपवरांच्या विवाहाचे. त्याचे मुहूर्तही आता सुरू होत असल्याने दागिने खरेदीसाठी सराफा दुकानांमध्ये गर्दी होत आहे. त्यातच आता सोन्या, चांदीचा भाव कमी होत असल्याने नागरिकांना थोडाफार दिलासा मिळतो आहे. याशिवाय दागिन्यांची आगाऊ नोंदणीही करण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे.
दिवाळी आणि लग्नसराईच्या काळात सोने, चांदीचे भाव वाढतात असा अनुभव आहे. त्यानुसार २४ कॅरेट सोन्याचा भाव ८० हजार रुपयांपर्यंत गेला होता. पण आता लग्नसराईच्या काळात भाव थोडेसे कमी होत असल्याचे चित्र आहे. दिवाळीनिमित्त सोने खरेदी झाली पण सोन्या-चांदीचे भाव वाढल्याने नागरिकांनी हात आखडता घेत थांबण्याची भूमिका घेतली होती. दिवाळीत २४ कॅरेट सोन्याने ८० हजारांचा तर चांदीने १ लाखांचा टप्पा गाठला होता. मागील १५ दिवसांच्या घसरणीनंतर शुक्रवारी २४ कॅरेट सोने ७४ हजार ३०० रुपयांवर, २२ कॅरेट सोने ६८ हजार ९०० रुपयांवर तर चांदी ८९ हजार रुपयांवर आली होती. यामुळे लगीनघरे व गुंतवणूक करणाऱ्यांसाठी संधी आहे.
इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण आळंदीकर म्हणाले, ‘‘सोने चांदीचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी, पुरवठा, भुराजकीय तणाव, महागाई, चलनातील चढउतार, अमेरिका फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदर आदी बाबींवर अवलंबून असतात. आता युद्धविराम होण्यासाठी पाऊल उचलल्याने सोने-चांदीचे भाव कमी झाल्याची शक्यता आहे. असे असले तरी पुढील महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व बँक व्याजदरात आणखी कपात करण्याची शक्यता असल्याने येत्या काळात भाव पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे लग्न ठरवलेल्या कुटुंबांचा आगाऊ सोने खरेदीचा व नोंदणीचा कल वाढला आहे. चांदीचीही उचल वाढत आहे.’’