मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान आमदार असलेल्या 10 जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागतिल्यानेच मनसेचा महायुतीत समावेश होऊ शकला नाही, अशी खात्रीलायक माहिती ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत सहभागी होण्यासाठी मनसे आग्रही होती. मनसेकडून मुंबई, ठाण्यातील शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान आमदार असलेल्या जवळपास 10 जागांची मागणी करण्यात आली होती, परंतु या जागा देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. महायुतीतील महत्त्वाचा साथीदार असलेल्या शिवसेनेला दुखावणे हिताचे ठरणार नाही, अशी भूमिका भाजप नेतृत्त्वाने घेतल्यानेच मनसेचा महायुतीत समावेश होऊ शकला नाही, असे शिवसेनेतील (शिंदे गट) एका बड्या नेत्यानेच ‘आपलं महानगर’ला सांगितले. (Mahim Assembly BJP MNS and CM मराठी Maharashtra Election 2024)
हेही वाचा : Maharashtra Assembly 2024 : निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात; राजकीय आरोप – प्रत्यारोपांना धार
– Advertisement –
मनसेने अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भांडुप, विक्रोळी, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, मागाठाणे, माहिम, वरळी आणि शिवडी या जागांची मागणी केली होती. या सर्व जागांवर सध्या शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान आमदार आहेत. असे असतानाही या जागा आमच्यासाठी सोडण्यात याव्यात, असा आग्रह मनसेचा होता, परंतु या जागा इतरांना देणे शक्य नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यास ठाम नकार दिला. विद्यमान आमदारांच्या जागा सोडण्याच्या अशक्यप्राय मागणीमुळेच मनसेचा महायुतीत समावेश होऊ शकला नाही, असे शिवसेनेतील (शिंदे गट) एका बड्या नेत्याने ‘आपलं महानगर’ला सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र याचा इन्कार केला आहे. मी जागा मागण्या न मागण्याचा काय संबंध येतो, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. महायुतीत सामील होण्याबाबत तशी चर्चा सुरू होती का, असे विचारले असता तुम्हाला यासंदर्भात माहिती आहे का? तसेच तुमच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की मी बोललो, तुम्हाला एखादी बातमी तुमची वाटणे आणि त्याला मी उत्तर देण्यास बांधिल नाही, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
– Advertisement –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुती आणि मनसेची विचारसरणी एकच आहे. दोघांनीही हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता, पण विधानसभा निवडणूक ते स्वतंत्रपणे लढत आहेत. पक्ष निवडणुकीपासून सतत दूर राहिल्यास कार्यकर्त्यांमध्ये शैथिल्य येते. यातूनच बहुधा राज ठाकरे हे स्वतंत्रपणे लढत असावेत. शेवटी पक्ष चालवण्याचा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मनसेने महायुतीबरोबर यावे असे प्रयत्न झाले, पण काही कारणाने ते शक्य झाले नाही, सध्या महायुतीत तीनच पक्ष असून चौथा पक्ष नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.