RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
esakal November 16, 2024 07:45 AM

RBI Governor Shaktikanta Das: डिसेंबरमध भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) चलनविषयक धोरण महत्त्वाचे असणार आहे. यावेळी चलनविषयक धोरण समितीची बैठक 4 ते 6 डिसेंबर दरम्यान होणार आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळही संपत आहे.

अशा परिस्थितीत ते त्यांच्या पदावर कायम राहतील की नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण त्यांच्या या पदावर कायम राहण्याचा तुमच्या खिशाशीही संबंध आहे.

उर्जित पटेल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर शक्तीकांता दास यांनी आरबीआय गव्हर्नरपदाची जबाबदारी स्वीकारली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी कोविड आणि त्यानंतर देशात निर्माण झालेल्या महागाईच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. अशा स्थितीत त्यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे.

देशातील महागाईची स्थिती पुन्हा एकदा गंभीर होताना दिसत आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर पुन्हा एकदा 6.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी शक्तीकांत दास यांनी आधी रेपो दर 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवला आणि नंतर तो सुमारे दीड वर्ष स्थिर ठेवला.

आता देशात पुन्हा महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतील विजयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत शक्तीकांत दास यांच्या जाण्याने पुढे काय होईल हा मोठा प्रश्न आहे.

तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

महागाईची सद्यस्थिती आणि अर्थव्यवस्थेतील आव्हाने लक्षात घेता, पुढील पतधोरणाच्या काळात रेपो दरात कपात केली जाणार नाही, हे स्पष्ट असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. RBI डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर आणि त्यानंतर अमेरिकेच्या धोरणांमध्ये होणाऱ्या बदलांची प्रतीक्षा करू शकते. त्यानंतरच ते याबाबत स्पष्ट निर्णय घेऊ शकतील.

रेपो रेटचा तुमच्या खिशावर अनेक प्रकारे परिणाम होतो. तुमच्या कारचा, घराचा किंवा वैयक्तिक कर्जाचा ईएमआय कमी होईल की नाही हे हे ठरवते. एवढेच नाही तर अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाहही रेपो दराने ठरवला जातो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची नियुक्त समिती त्यांच्या नियुक्तीवर निर्णय घेते. आरबीआय गव्हर्नरचा कार्यकाळ वाढवायचा की नाही हे सरकारवर अवलंबून आहे. आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास हे 67 वर्षांचे आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.