SA vs IND, Video: अरेरे! संजू सॅमसनच्या जोरदार सिक्सने फॅनला रडवलं, बॉल तोंडाला लागल्याने घ्यावे लागले उपचार
esakal November 16, 2024 11:45 AM

South Africa vs India 4th T20I: दक्षिण आफ्रिका विरुद्ध विरुद्ध भारत यांच्यात जोहान्सबर्गला झालेला चौथा टी२० सामना संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या फलंदाजीने गाजवला. या सामन्यात या दोन्ही खेळाडूंनी शतके केली.

भारताने हा सामना तब्बल १३५ धावांनी जिंकला. यासोबत चार सामन्यांची ही मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली आहे. मात्र, या सामन्यात एक चाहती जखमी झाली.

झाले असे की भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी पहिल्या विकेटसाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी ७३ धावांची भागीदारी केली. अभिषेक ३६ धावांवर बाद झाला.

त्यानंतर सॅमसन आणि तिलक वर्मा वादळी खेळ करत होते. त्यांनी प्रत्येक षटकात मोठे फटके खेळले. याचदरम्यान, १० व्या षटकात दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्स गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर संजू सॅमसनने षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले.

त्यानंतर त्याने दुसऱ्या चेंडूवरही मिड-विकेटच्या वरून जोरात शॉट खेळला. मात्र त्यावेळी स्टँड मध्ये बसलेल्या एका चाहतीचे चेंडूकडे लक्ष गेले नाही आणि तो चेंडू तिच्या तोंडावर येऊन आदळला.

चेंडू जोरात लागल्याने चाहती वेदनेने कळवळली. पण लगेचच तिला उपचार म्हणून आईस पॅक देण्यात आला. यावेळी ती चाहती वेदनेनं रडतानाही दिसली. या क्षणाचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर सॅमसनने ५६ चेंडूत ६ चौकार आणि ९ षटकारांसह १०९ धावांची नाबाद खेळी केली. तसेच तिलक वर्माने ४७ चेंडूत १२० धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि १० षटकार मारले. त्यामुळे भारताने २० षटकात १ बाद २८३ धावा केल्या.

त्यानंतर २८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला १८.२ षटकात सर्वबाद १४८ धावाच करता आल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सने ४३ धावांची खेळी केली. तसेच डेव्हिड मिलरने ३६ धावांची खेळी केली. त्याचबरोबर मार्को यान्सिनने २९ धावांची खेळी केली. गेराल्ड कोएत्झीने १२ धावा केल्या. या चौघांनाच दोनआकडी धावसंख्या पार करता आली.

भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर हार्दिक पांड्या, रमणदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.