व्लॉगरच्या रहस्यमय आणि धक्कादायक जगातील कथा सांगणारा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट आता प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. चित्रपटात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, आणि विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात व्लॉगरच्या आयुष्यातील गूढ आणि धक्कादायक घटनेचा थरार दाखवला आहे, जो प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतो.
चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, “प्रेक्षक आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’ प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. या चित्रपटातून व्लॉगरच्या आयुष्यातील रहस्य आणि थरार पाहाणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल.” निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणतात, “आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्राईम व्हिडीओवर उपलब्ध केला आहे. या रहस्यमय कथेचा आता घरबसल्या आनंद घेता येईल.”
अमेय वाघ, अमृता खानविलकर अभिनीत ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट आता OTT वर रिलीज होणार आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट घरबसल्या प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाची कथा ही पूर्ण गावातून मुंबईत आलेल्या तरुणाची आहे. झटपट पैसा मिळवण्याची क्लृप्ती शोधणारा आणि त्यात पटाईत असलेला रोहिदास मुंबईत आल्यानंतर अशा पद्धतीने पैसा कमवण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतो. त्याला तसे साथीदार मिळत जातात. अर्धवट शिक्षण किंवा पूर्ण शिक्षण असलं तरी महागडं घर-गाड्या घेण्याचं स्वप्न मनाशी बाळगत त्यासाठी झटपट पैसे कसे मिळवता येतील? यामागे लागलेले रोहिदाससारखे अनेक तरुण-तरुणी गावखेड्यांतच कशाला मुंबईसारख्या महानगरांमध्येही खोऱ्याने सापडतील.
या चित्रपटातून तरुणाईची दिसणारी ही बाजू एकाअर्थी भविष्यातील भयंकर स्थितीची चुणूक दाखवणारी आहे. रहस्यमय मांडणी असलेल्या या चित्रपटातून वास्तवाचे धागे उलगडत असले तरी मुळात ती मुख्य गोष्ट नाही हे लक्षात घेऊन मेरूकर यांनी काहीशी हलकीफुलकी मांडणी ठेवत हे तपासनाट्य रंगवलं आहे. त्यामुळे पाहताना त्यातली उत्कंठाही हरवत नाही आणि खूप काहीतरी तणावपूर्ण पाहतो आहे असं दडपणही येत नाही. त्यातली रंजकता हरवणार नाही याची काळजी घेत केलेलं पटकथालेखन आणि खुसखुशीत दिग्दर्शकीय मांडणी यामुळे चित्रपट नेमकेपणाने पोहोचतो.