मुंबई - देशात हरित ऊर्जानिर्मिती क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या नऊ महिन्यांत देशभरात तब्बल २० हजार मेगावॉट क्षमतेचे हरित ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारले आहेत. यातून एप्रिलपासून वीजनिर्मिती सुरू होणार आहे.
त्यामुळे वीज वितरण कंपन्यांना पुरेशी वीज उपलब्ध होणार आहे. हरित ऊर्जा प्रकल्पांत गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. सध्या औष्णिक प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. कोळशाच्या वाढत्या दरामुळे विजेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत. त्यात १७ हजार ४४४ मेगावॉटचे सौर, तर २,६५७ मेगावॉटचे पवन ऊर्जा प्रकल्प असल्याचे जेएमके रिसर्चच्या अहवालातून उघड झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या नऊ महिन्यांत १०६ टक्क्यांहून अधिकचे प्रकल्प उभे राहिले आहेत.
पर्यावरण संवर्धनाला हातभार
सौर आणि पवन ऊर्जानिर्मिती क्षमता वाढल्याने औष्णिक प्रकल्पातील विजेवरील अवलंबित्व कमी होणार आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे. तसेच वीज वितरण कंपन्यांना अपारंपरिक ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुरेशी हरित ऊर्जा उपलब्ध होणार आहे.