पुणे – महायुतीतील तीन नेत्यांची तोंडं आताच तीन दिशेला झाली आहेत. महायुतीमधील नेत्यांना पराभव दिसत आहे. त्यामुळे पराभवाचे खापर कोणावर फोडायचे याची रंगीत तालीम सुरु झाली आहे. त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबद्दल ‘नया है वह!’ अशी टिप्पणी केली असल्याचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. ते पुण्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्त आले असताना माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा विधानसभेत निर्विवाद विजय होणार असल्याचा दावा करत खासदार कोल्हे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीला 165 पेक्षा अधिक जागा मिळतील.
राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे आज काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कसबा मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात महाविकास आघाडीचा विजय होताना दिसत आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या तिन्ही पक्षांनी एकत्रित प्रचार केला आहे. महाविकास आघाडीच्या राज्यात 165 पेक्षा अधिक जागा निवडून येतील आणि बहुमताने आमचे सरकार स्थापन होईल असा दावा खासदार अमोल कोल्हे यांनी केला. महाराष्ट्रात शरद पवार यांची सूनामी दिसत आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या (शरद पवार) 60-65 जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
– Advertisement –
मुख्यमंत्री कोण होणार यासाठी आमची लढाईच नाही, त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा आमची लढाई ही महाराष्ट्रातील माताभगिणी सुरक्षित कशा राहतील यासाठी आहे. राज्यातील युवकांना रोजगार, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव यासाठी लढाई आहे. महाराष्ट्र धर्मासाठी ही लढाई असल्याचे ते म्हणाले.
अमोल कोल्हे यांचा एक व्हिडिओ अजित पवार गटाकडून व्हायरल केला जात आहे. अजित पवारांचा नामोल्लेख टाळून ते म्हणाले की, विद्यमानांना त्यांचा पराभव दिसत आहे, म्हणून स्लिप ऑफ टंगचेही व्हिडिओ त्यांना व्हायरल करावे लागत आहेत. विद्यमानांनी त्याच वेळी शरद पवारांसोबत राहण्याची भूमिका घेतली असती तर त्यांना असे व्हिडिओ व्हायरल करण्याची गरज भासली नसती असा टोलाही त्यांनी लगावला.
– Advertisement –
खासदार कोल्हे म्हणाले की, आत्ता एक पुस्तक आले आहे, त्या पुस्तकात अनेक खुलासे करण्यात आल्यानंतर राज्याला गद्दारी आवडत नाही. महाराष्ट्र चुकीला माफी करतो पण गद्दारीला नाही असे सांगत त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. पराभव समोर दिसत असल्याने अजित पवार भावनिक आवाहन करत आहेत. केवळ इमारती बांधून विकास होत नसतो, लोकांची कामं करावी लागतात असंही खासदार कोल्हे म्हणाले.
हेही वाचा : Shiv Sena Pramukh : विचारधारेशी समर्पण आणि तत्वांशी कटिबद्धता… अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Edited by – Unmesh Khandale