पुणे, ता. १७ ः पश्चिम भारतातील सर्वात मोठे ग्रंथ व शिक्षण प्रदर्शन ‘पुणे पुस्तक जत्रा’ ४ ते ८ डिसेंबरदरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात येत आहे. यंदा या प्रदर्शनाचे २२ वे वर्ष आहे.
‘ज्ञानसंपन्न समाजाच्या दिशेने’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या प्रदर्शनामध्ये नामवंत पुस्तक विक्रेते आणि वितरक, प्रकाशन संस्था, शैक्षणिक संस्था, भारत सरकार व महाराष्ट्र सरकारची प्रकाशने, माहिती, आरोग्य व्यवस्थापन, व्यापार, कायदा, धर्म, राजकारण, गणतंत्र, लोकसाहित्य, काव्य, कविता, अध्यापन, प्रशिक्षण अशा विविध विषयांवरील इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, आणि परदेशी भाषेतील पुस्तके, वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके व ग्रंथ एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘पुणे पुस्तक जत्रे’मध्ये विविध विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे.