पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयात हजर होण्याबाबत बजावलेले समन्स अखेर त्यांच्या घरी पोचले आहे. यापूर्वी पाठवलेले समन्स तीस हजारी जिल्हा न्यायालयाऐवजी पतियाळा हाऊस न्यायालयात गेल्याने पुन्हा पुण्याच्या विशेष न्यायालयात परत आले होते. त्यामुळे गांधी यांना विशेष न्यायालयाकडून पुन्हा समन्स बजावण्यात आले होते.
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात न्यायालयात हजर होण्याबाबत गांधी यांना बजावलेले समन्स चुकीच्या न्यायालयात गेल्याने परत आले होते.
हे समन्स दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात गेले आहे. मात्र, राहुल गांधी यांचे निवासस्थान तीस हजारी जिल्हा न्यायालयाच्या हद्दीत असल्याने समन्स बजावण्याची कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात केली जाणार होती. नव्याने पाठवलेले समन्स गांधी यांची घरी पोचले असून ते त्यांनी स्वीकारले देखील आहे.
आज सुनावणी
गांधी यांच्यावर दाखल असलेल्या दाव्याची सुनावणी आजी-माजी खासदार-आमदारांविरोधात खटले चालविणाऱ्या विशेष न्यायालयात होत आहे. त्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना हाजीर होण्याचे समन्स बजावले आहे. या प्रकरणी उद्या (ता. १८) सुनावणी होणार आहे. समन्स मिळाल्याने आता सुनावणीसाठी राहुल गांधी उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दाव्याच्या सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत राहुल गांधी यांना बजावलेले समन्स त्यांच्या घरी पोचले आहे. त्याबाबतचा टपाल विभागाचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. समन्स मिळाल्यानंतरही गांधी गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघू शकते.
अॅड. संग्राम कोल्हटकर, सात्यकी सावरकर यांचे वकील