नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. विधानसभेची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी आणि शाह महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. त्यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका केली होती. यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.
गिरीश महाजन म्हणाले की, ते आमच्या सोबत इतके वर्ष होते, त्यावेळेस त्यांना कळालं नाही कोण शत्रू आहे कोण दुश्मन आहे. संजय राऊत यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, वाटेल ती बडबड ते करत असतात. त्यांनी काहीही म्हटलं तरी त्याचा मतदानावर परिणाम होणार नाही. पण त्यांनी आपली पात्रता पाहूनच बोललं पाहिजे, असं मला वाटतं. आमचा पक्ष देशभर आहे ते आपले गटारातले बेडूक आहेत. डबक्यातले बेडूक आहेत, असा हल्लाबोल त्यांनी संजय राऊत यांच्यावर केला.
ते पुढे म्हणाले की, 87 टक्के राज्यात आमची सत्ता आहे. आम्ही जिंकलो तर तिकडे आनंद होतो. मध्य प्रदेश जिंकला तर आम्ही फटाके फोडतो, झारखंडमध्ये उद्या जिंकलो तर आम्ही इथे फटाके फोडू, त्यात त्यांना वाईट का वाटतंय? तुम्हाला कोण आहे? तुम्हाला कोणीच नाही. त्यांनी आपली पात्रता पाहूनच बोललं पाहिजे, असा टोला देखील गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असे वक्तव्य केले आहे. याबाबत विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, आमच्यामध्ये कुठेही रस्सीखेच नाही. महायुतीमध्ये आमच्याकडे मुख्यमंत्री कोणाला व्हायचंय अशी कुठेही ओढाताण नाही. निकाल लागल्यानंतर सर्व बसू, त्यानंतर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, दिल्लीचे वरिष्ठ नेते त्यावर शिक्कामोर्तब करतील, हा वादाचा विषय नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय. ते म्हणतात लाडक्या बहिणी योजना आम्ही योजना रद्द करू, अदानींबाबतचा निर्णय रद्द करू. अडीच वर्ष त्यांच्याकडे सरकार होतं त्यावेळी त्यांनी काय केलं? एकही चांगलं काम केलं नाही, विकासासाठी काही निर्णय घेतला नाही, गरिबांच्या कल्याणकारी योजनांबाबत काही केलं नाही. अडीच वर्ष घरात बसून राहिले, त्यांनी काहीच केलं नाही. आता म्हणताय काही निर्णय झालेत, ते रद्द करू. त्यांना एवढेच जमते, विकासात्मक दृष्टिकोन त्यांच्याकडे नाही, असा टोला गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
आणखी वाचा