Aaditya Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhan Sabha Election 2024) चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या निमित्तानं ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) जोरात प्रचार करताना दिसत आहे. अनेक माध्यमांना त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. अशातच, अनेक मुलाखतींमध्ये आदित्य ठाकरेंना लग्न कधी करणार? आयुष्यात कुणी आहे का? मुलगी कशी हवी? यांसारखे प्रश्न विचारण्यात आले. खरं तर, ठाकरेंची सून कोण होणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यातच नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. प्रचाराच्या धावपळीतही तिचा आवर्जुन मेसेज येतो, जेवलास का? असं आदित्य ठाकरे म्हणाले आणि उपस्थितांसह अवघ्या महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या. आदित्य ठाकरेंना आवर्जुन मेसेज करणारी 'ती' कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडला.
आदित्य ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मुलाखती देत आहेत. महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनला त्यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरेंनी आवर्जुन जेवलास का? असा आवर्जुन मेसेज करणारी 'ती' म्हणजे, आदित्य ठाकरेंची आई रश्मी उद्धव ठाकरे. आपल्या आईबद्दल आदित्य ठाकरे भरभरून बोलले. कधी कधी असं असतं की जमिनीवर ठेवायला, आई महत्त्वाची असते, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. अशावेळी प्रचार कार्यात आई आणि वडील दोघांचीही मदत होते, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले आहे. मुलाखतीत तुमचं सर्वात जास्त कुणासी पटतं? असं विचारण्यात आलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी दोघांशीही असं उत्तर दिलं. त्यानंतर रश्मी ठाकरे नेमकी कशी मदत करतात? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कधीकधी प्रचारात किंवा इतर कामांत असताना मी ठरवतो की, आता फोन पाहायचा नाही. कारण समोरुन आईचा प्रश्न असतो की, जेवलास का? पाणी पितोस का? हल्ली तर आईने विचारणं पण सोडून दिलंय. नुसतं आल्यानंतर, घरी गेल्यावर ओरडा अपेक्षित असतोच थोडा थोडा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रचारात दोघांचीही मदत होते. वडीलही बऱ्याचदा फोन करतात. पण, आई खूप महत्त्वाची असते. कधी कधी असं असतं की जमिनीवर ठेवायला, म्हणजे ती खेचून घेते आम्हाला...
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. सगळ्याच ठिकाणी त्यांना एक प्रश्न आवर्जुन विचारण्या आला तो म्हणजे, लग्न कधी. येत्या 23 तारखेला कोंढाण्याचं लग्न, रायबाचं कधी? असा प्रश्न या निवडणुकीत त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी मात्र काढता पाय घेतला. प्रश्नानंतर आदित्य ठाकरेंनी एका क्षणाचाही विलंब न लावता 'चला वेळ झाली आता निघायची', असं म्हणाले आणि लग्नाच्या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं.