कर्जत : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर सभा घेतली. या सभेतून रोहित पवार यांनी शरद पवारांचा 'राजकारणातील वस्तादांचा वस्ताद', असा उल्लेख केला. तसेच त्यांच्या विरोधातील उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
रोहित पवार म्हणाले की, सभेसाठी 30 हजार खुर्च्या ठेवल्या होत्या, त्या कमी पडल्या. शेजारी भाजपची सभा सुरू आहे. तिथल्या मोकळ्या खुर्च्या आपण आणल्या आणि इकडे लावून टाकल्या, असे म्हणत त्यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या सभेवर टीका केली. पवार साहेब सभेला आल्याने मी भावनिक झालोय. येणाऱ्या 20 तारखेला एक लाखांची लीड कशी मिळेल, यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे.
माझी राज्यातील ओळख ही पवार साहेबांमुळेच आहे. ईडी, सीबीआयचे संकट माझ्यावर आले. पण, मी घाबरलो नाही. कर्जत-जामखेडच्या लोकांनी मला लढायला शिकवले आहे. माझे कुटुंब म्हणजे माझी कर्जत-जामखेडची जनता आहे, असे म्हणत भाषण सुरू असताना रोहित पवारांनी स्टेजवर नतमस्तक होत जनतेला अभिवादन केले. लाडकी खुर्ची जपण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडला.
अडचणीच्या काळात जी माणसं आपल्यासोबत असतात, तीच माणसं आपली असतात. 25 वर्ष ज्या बस डेपोसाठी जनता वाट पाहत होती, तो सहा महिन्यात आपण मंजूर करून आणला. 12 खात्याचे मंत्री राहिलेल्या व्यक्तीला ते करता आलं नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका केली. 38 हजार महिलांपर्यंत माझी आई पोहचली. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी 33 कोटी रुपयांची मदत महिलांना दिली. माझ्या वडिलांचा शेती क्षेत्रातला अभ्यास आहे, ते माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेती मार्गदर्शन करतात. काही दिवसांपूर्वी माझ्यावर राम शिंदे यांच्याकडून खालच्या पातळीवर बोललं गेलं. महिलांबद्दल अश्लील भाषेत हातवारे केले गेले. माझ्या आईने मला सांगितले की, विरोधक काहीही बोलले तरी तु तुझ्या भाषणात महिलांचा आदरच केला पाहिजे, असे म्हणत त्यांनी राम शिंदेंना टोला लगावला. 200 लोकांकडून टाळ्या मिळवण्यासाठी भाषणात काहीही बोलणं योग्य नाही. शेवटी कामं करावी लागतात, पण कोरोना काळात तुम्ही घरातील बागेला पाणी घालत बसला होतात. जेव्हा लोकांना, जनावरांना पाणी मिळत नव्हतं, तेव्हा तुम्ही घरात बसला होतात, असा घणाघात देखील रोहित पवारांनी राम शिंदेंवर केला.
आणखी वाचा