"सांगलीत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी एका प्रचार सभेत ‘मी बंटी पाटील यांच्यासारखा वागलो तर जिल्ह्यात एकही विरोधक शिल्लक राहणार नाही, असे सांगितले. यावरून सतेज पाटील यांची प्रवृत्ती दिसून येते."
कोल्हापूर : ‘फुलेवाडीत प्रचारसभेत केलेल्या महिलांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. त्याबाबत, ‘माझे हात तोडा, लाथा घाला’, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रत्येक भाषणात सांगत आहेत. मला त्यांची माफी मागायची आहे. मला आव्हान द्यायचे नाही. परंतु, या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही’, असा टोला खासदार (Dhananjay Mahadik) यांनी लगावला.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तपोवन मैदानात आयोजित सभेत प्रचारसभेत ते बोलत होते. सभेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) प्रमुख उपस्थित होते. खासदार महाडिक म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) २०१९ पासून पहिली अडीच वर्षे समृद्धी महामार्ग, कोस्टल मार्ग, मेट्रो, नाणार, अटल सेतूला स्थगिती आणि स्थगितीच दिली होती. त्यानंतर जून २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आले. त्यानंतर सर्वच प्रकल्प मार्गस्थ लागले. महायुतीच्या सरकारच्या स्थापनेत माझाही छोटा वाटा आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-संकेश्वर रस्ते प्रकल्प सुरू झाले. स्वप्नवत वंदे भारत ट्रेन कोल्हापुरात सुरू झाली. आयआरबी आणि टोलनाके आमच्या उरावर सतेज पाटील यांनी आणले. थेट पाईपलाईनचे काम अपूर्णच आहे. अडीच वर्षांत ती पूर्ण झाली नाही तर राजकीय संन्यास घेईन, असे ते बोलले होते. ती योजना अजून तरी पूर्ण झालेली नाही. तरीसुद्धा सतेज पाटील यांनी त्या पाण्यात अंघोळ केली आहे.’ खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘अमल महाडिक पुन्हा आमदार होतील. त्यांनी विजयाची कमान हातात घेतली आहे. सालस स्वभाव, सामान्य माणसात मिसळणारा हा माणूस आहेत.’
‘उत्तर’चे उमेदवार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘महायुतीचे सरकार आल्यापासून शहरातील १०० कोटींचे रस्ते मंजूर झाले. त्याची वर्कऑर्डर झालेली नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र, वर्कऑर्डर झाली नसेल तर मी राजकीय संन्यास घेईन. हेच आरोप खोटे ठरले, तर तुम्ही संन्यास घ्यावा. शहरासाठी ३२०० कोटी रुपयांचा निधी. तसेच शहर सुशोभीकरणासह पूरनियंत्रण आदी कामे मंजूर आहेत.’
‘दक्षिण’चे उमेदवार अमल महाडिक म्हणाले, ‘माझ्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, हे माझे भाग्य आहे. मी केलेल्या कामाचा कधीही गवगवा केला नाही. माझे बोलणे कमी आणि काम जास्त आहे. माझी खाली बसलेली जनता हाच माझा आवाज आहे.’ ‘करवीर’चे उमेदवार चंद्रदीप नरके म्हणाले, ‘पहिल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीमुळे विकास रखडला. त्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पायाभूत सुविधांसह लोककल्याणकारी योजना कार्यन्वित झाल्या. जिल्ह्यात मी म्हणेन त्याप्रमाणेच होईल, असा एका नेत्याचा दहशतवाद निवडणुकीनंतर संपुष्टात येईल.’
याप्रसंगी ‘जनसुराज्य’चे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, दलित महासंघाचे प्रा. मच्छिंद्र सकटे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, बाळ महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हातकणंगलेचे उमेदवार अशोकराव माने, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार जयश्री जाधव, ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक, प्रा. जयंत पाटील आदी उपस्थित होते.
सतेज पाटलांकडून जिल्ह्याला मागे नेण्याचे काम‘सांगलीत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी एका प्रचार सभेत ‘मी बंटी पाटील यांच्यासारखा वागलो तर जिल्ह्यात एकही विरोधक शिल्लक राहणार नाही, असे सांगितले. यावरून सतेज पाटील यांची प्रवृत्ती दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्याला मागे नेण्याचे काम सतेज पाटील यांनी केले आहे,’ असा घणाघात खासदार महाडिक यांनी केला.
युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ‘बुलडोझर बाबा’ अशी आक्रमक नेता म्हणून सर्वत्र प्रसिद्धी आहे. त्यामुळे त्यांना बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी हलगीच्या कडकडाटात अनेक युवकांचे जथ्थ्येच्या जथ्थ्ये सकाळी दहा वाजल्यापासून सभास्थळी येत होते. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. महायुतीच्या उमेदवारांपेक्षा योगींचीच छायाचित्रे असलेले फलक सर्वत्र दिसत होते.