Sheffield Shield: भारतीय संघ IND vs AUS कसोटी मालिकेसाठी पर्थवर कसून सराव करतोय. २२ नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मागील दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने ऐतिहासिक विजय मिळवले असले तरी यंदा ऑस्ट्रेलियन संघ सहज हार मानणारा नाही. याची प्रचिती देणारा एक प्रसंग शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत पाहायला मिळाला. डावा खांदा दुखावला होता, हात हलवताही येत नव्हता, तरी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मैदानावर फलंदाजीला आला आणि एका हाताने फलंदाजी करताना १०व्या विकेटसाठी १५ धावा जोडल्या.
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ॲश्टन ॲगर याने ही कमाल केली. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळणाऱ्या ॲगरचा खांदा दुखावला गेला होता आणि त्याने दुसऱ्या डावात व्हिक्टोरीयाविरुद्ध एका हाताने फलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या ऑल राऊंडरच्या डाव्या खांद्याला ही दुखापत झाली होती आणि त्याला बॅट पकडताही येत नव्हती. तरीही तो संघासाठी ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तेव्हा संघाच्या ९ बाद ३१० धावा होत्या. त्याने जोएल कर्टीससह १०व्या विकेटसाठी १५ धावा जोडल्या. सॅम एलिओटने ( ४-४७) त्याची विकेट घेतली.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १६७ धावांवर गडगडला. सलामीवीर सॅम फॅनिंग ( ३४) व जोएल कर्टीस ( ३६) यांनी संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. व्हिक्टोरियाच्या टॉड मर्फी ( ४-३७), फर्गूस ओनेल ( ३-४३) व झेव्हियर क्रोन ( २-२०) यांनी चांगला मारा केला.
प्रत्युत्तरात व्हिक्टोरीयाने ३७३ धावा उभ्या केल्या. थॉमस रॉजर्स ( ७६), पीटर हँड्सकोम्ब ( ५६), झेव्हियर क्रोन ( ६२) यांनी अर्धशतकीय खेळी करून संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. जोएल पॅरिस, कॅमेरून ग्रीन व कोरी रोचिसिओली यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने जोएल कर्टीसच्या नाबाद ११९ धावांच्या जोरावर ३२५ धावांपर्यंत मजल मारली. त्याला हिल्टन कार्टराईट ( ७८) व अॅश्टन टर्नर ( ४१) यांनी साथ दिली. पण, अन्य फलंदाज ढेपाळले. अॅश्टनचा हात दुखत असूनही तो फलंदाजीला आला.
व्हिक्टोरीयाने २ बाद १२२ धावा करून हा सामना जिंकला. मार्कसने ५६ धावांची खेळी केली, तर पीटर हँड्सकोम्ब ५६ धावांवर नाबाद राहिला.