प्रशांत जगताप की चेतन तुपे? मतदार पुन्हा देणार वेगळ्या पक्षाला संधी? मतदारांचा कौल कोणला?
एबीपी माझा वेबटीम November 18, 2024 10:13 PM

Hadapsar Assembly constituency : हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आणि सर्वांचं लक्ष्य केंद्रीत असलेला मतदारसंघ आहे. हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे चेतन विठ्ठल तुपे हे विद्यमान आमदार आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने यावेळीही चेतन तुपे यांना उमेदवारी दिली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे आमदार चेतन तुपे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर अशी तिरंगी लढत होणार असली तरी राष्ट्रवादीमध्येच खरी चुरस होणार आहे.

हडपसर मतदारसंघाचा इतिहास

हडपसर विधानसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून येथे तीन निवडणुका झाल्या आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी येथून प्रत्येकी एकदा विजय मिळवला. 2009 मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 मध्ये भाजपने हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांना उमेदवार म्हणून उभे केले. टिळेकर यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक जिंकली. त्यानंतर 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन विट्ठल तुपे यांना विजय मिळवला. 

हडपसरची जनता दरवेळी देते वेगळ्या पक्षाला संधी

2019: चेतन विठ्ठल तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस
2014: योगेश टिळेकर, भारतीय जनता पार्टी
2009: महादेव बाबर, शिवसेना


आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता हडपसरची जनता कोणाला संधी देणार हे येत्या 23 नोव्हेंबरला समजेल. मात्र, या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागलं आहे. यावेळी देखील वेगळ्या पक्षाला संधी मिळणार की राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे मतदारसकोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. 

यावेळी काय असेल समीकरण?

यावेळी हडपसर विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांशी भिडणार आहेत. 2019 मध्ये येथून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर चेतन तुपे अजित पवारांच्या पक्षात आहेत. यावेळी अजित पवार गटाने चेतन तुपे यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार गटाने प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जनता कोणाची कौल देते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

2019 चा निकाल

2019 मध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून तर शिवसेना-भाजप युतीकडून योगेश टिळेकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये चेतन विठ्ठल तुपे यांना 92 हजार 326 तर योगेश टिळेकर यांना 89 हजार 506 एवढी मते मिळाली होती. या निवडणुकीत केवळ 2 हजार 820 च्या फरकाने चेतन तुपे निवडून आले होते.

 
 
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.