देहूरोड, ता.१८ : केंद्रीय विद्यालयामध्ये (क्र.२) ‘किडोफेस्ट’चे आयोजन करण्यात आले. देहूरोड शस्त्रात्र निर्मिती कारखान्याचे महाव्यवस्थापक जी. के. चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दिवसाची सुरुवात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेने झाली; तर इयत्ता ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या पाककलेचे कौशल्य दाखवत नानाविध पदार्थ, खेळ, शीतपेयांचे स्टॉल मैदानावर उभारले होते. चौधरी यांनी अनेक खाद्य पदार्थांचा प्रत्यक्ष स्टॉलवर जाऊन आस्वाद घेतला. विद्यार्थ्याची प्रशंसा करून दूरदृष्टी, कुशलता तसेच विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर घालण्यासाठी हा ‘किडेफेस्ट’ निश्चितच मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
बाल दिनाचे औचित्य साधून बुलबुल संकुलस्तरीय स्पर्धेत पुणे समभागामधील आठ केंद्रीय विद्यालयांचा सहभाग होता. त्यामध्ये २४० विद्यार्थी सहभागी झाले होते. संयोजन प्राचार्य चंद्रशेखरसिंह चौहान आणि मुख्याध्यापक प्रबीर नाग यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.