पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक
Marathi November 20, 2024 01:24 AM

शंभू सीमेवरून शेतकरी 6 डिसेंबरला दिल्लीकडे कूच करणार

वृत्तसंस्था/ चंदीगड

शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याची तयारी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी शंभू सीमेवर आंदोलन करत बसलेले शेतकरी सर्व पिकांवर एमएसपीची मागणी करत मोठे पाऊल उचलणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या चंदीगडमध्ये झालेल्या बैठकीनंतर आंदोलन पुढे नेण्यासाठी शेतकरी संघटनांनी 6 डिसेंबर रोजी शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते सर्वनसिंह पंधेर यांनी सोमवारी याविषयी माहिती देताना 6 डिसेंबर रोजी शेतकरी एकजूट होऊन शंभू सीमेवरून दिल्लीकडे कूच करतील, असे जाहीर केले.

पुढील महिन्यात होणाऱ्या आंदोलनावेळी शेतकरी दिल्लीच्या दिशेने पायी प्रयाण करणार असल्याचे पंधेर यांनी सांगितले. या काळात शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली घेऊन पुढे जाणार नाहीत. यासंदर्भात पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यातील शेतकरी संघटनांशी दिल्ली मोर्चाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली असून लवकरच शेतकरी संघटना शंभू सीमेवर एकत्र येणार असल्याचे पंधेर यांनी सांगितले. या आंदोलनावेळी निदर्शनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पंधेर यांनी सरकारकडे केली आहे. त्यांनी मोदी सरकारला अल्टिमेटम देत सरकारकडे 6 डिसेंबरपर्यंत वेळ असल्याचे सांगितले.

हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा जमाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.  18 नोव्हेंबर रोजी झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतकरी 6 डिसेंबरला दिल्लीकडे कूच करतील, असा निर्णय घेण्यात आला. शेतकरी गेल्या 9 महिन्यांपासून गप्प बसले आहेत, मात्र सरकारकडून आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कारणास्तव आम्ही दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. शंभू सीमेवरूनच शेतकरी दिल्लीला रवाना होतील. यावेळी आम्ही ट्रॅक्टर-ट्रॉली सोबत घेणार नसून ग्रुपने जाणार आहोत, असे पंधेर यांनी स्पष्ट केले.

सरकारने आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास शेतकरी मागे हटणार नाहीत. गटातटाने दिल्लीला धडकणार असून आम्ही सरकारकडे आंदोलन करण्यासाठी जंतर मंतर आणि रामलीला मैदानावर जागा मागितली आहे. आम्हाला एक संधी द्या म्हणजे आम्ही आमची भूमिका मांडू आणि सरकारने आम्हाला आंदोलन करण्यासाठी जागा द्यावी. शेतकऱ्यांवर बॉम्ब फेकून हे प्रकरण संपवायचे की बैठकीच्या माध्यमातून तोडगा काढावा हा निर्णय आता सरकारवर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी जवळपास 10 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मागच्या वेळी शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यावर ठाम असताना आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.