रोहित पवारांकडून कर्जत जामखेडमध्ये पैशांचं वाटप, भाजपचा आरोप, रोहित पवार म्हणाले…
Marathi November 20, 2024 02:24 AM

Karjat Jamkhed Vidhansabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्याकडून कर्जत जामखेड मतदारसंघात पैशांचं वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे. बारामती अॅग्रोच्या (Baramati Agro) अधिकाऱ्यांकडून कर्जत जामखेडमध्ये (Karjat Jamkhed) हे पैशांचे वाटप सुरु असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून रोहित पवारांवर हे आरोप करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याचीही मागणीही करण्यात आली आहे. तसेच यावर खासदार सुप्रिया सुळेंनी आता मूग गिळून गप्प बसू नये असंही भाजपनं म्हटलं आहे. तर माझ्या मतदारसंघात पैसे वाटप करतानाचं पद्धतशीरपणे नाटक रंगवण्यात आलं असून यासंदर्भात मी सविस्तर माहिती देणार असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.

कर्जत- जामखेड मतदारसंघातील नान्नज येथे रोहित पवारांच्या माणसांकडून पैसे वाटप केल्याचा दावा देखील भाजपनं केला आहे. मोहिते नावाचा व्यक्ती पैसे वाटप करत असल्याचा राम शिंदे यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. संबंधित व्यक्तीला पैशासह लोकांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अद्याप गुन्हा दाखल नाही. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीची चौकशी सुरु झाली आहे.

ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे अधिकारी पैसे वाटत असल्याचं उघड झालं आहे. या अधिकाऱ्यांकडे दारूसाठी किती पैसे आणि कुणाला द्यायचे किती याचा तपशील आहे. मतदारांची यादी आणि पैशांचं घबाडही सापडलं आहे. निवडणूक आयोगानं यावर त्वरीत कारवाई करावी आणि सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी मूग गिळून गप्प बसू नये असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच या काही फोटो देखील ट्वीटवर शेअरप केले आहेत.

कर्जत जामखेडच्या लढतीकडं सर्वांचं लक्ष

कर्जत जामखेड मतदार संघामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राम शिंदेंमध्ये सामना रंगणार आहे. गेल्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले रोहित पवार यंदाही बाजी मारणार की राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 2019 च्या विधानसभेला कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. कर्जत- जामखेड मतदार संघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले होते.  या निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारली होती. रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात राम शिंदे यांना अस्मान दाखवले होते.  राम शिंदे यांना 92 हजार 477 मते पडली होती. तर रोहित पवार यांनी 1 लाख 35 हजार 824 मते मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला होता.

महत्वाच्या बातम्या:

Karjat Jamkhed Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे रंगणार सामना; कोण उधळणार विजयाचा गुलाल?

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.