कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांच्या कंपनीच्या माणसाकडून पैसे वाटप? एक जण ताब्यात; रंगेहाथ पकडल्याचा भाजपचा आरोप
सुनिल भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर November 20, 2024 11:13 AM

Karjat Jamkhed Assembly Constituency: कर्जत-जामखेड : अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून मतदारांना पैसेवाटप करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. रोहित पवारांशी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्याला हातात पाचशेच्या नोटा आणि यादी घेऊन रंगेहाथ पकडल्याचा दावा भाजपनं केला आहे. त्या कर्मचाऱ्याकडून पैसे वाटपाचा तपशील लिहिलेली चिठ्ठीही सापडली असल्याचंही भाजपनं म्हटलं आहे. तर कर्जतच्या वायसेवाडीत पैशासह एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

जामखेड तालुक्यातील नान्नज या गावात रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीतील कर्मचारी पैसे वाटप करत असल्याचा दावा राम शिंदे समर्थकांनी केला आहे. नान्नज गावात मधुकर मोहिते हा व्यक्ती पैसे वाटप करत असल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल करण्यात आला. या व्यक्तीकडे काही पैसे आणि एक यादी मिळून आली आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरू केली असून संबंधित व्यक्तीकडे 47 हजार रुपये मिळून आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, दुसरीकडे संबंधित व्यक्ती हा पैसे वाटप करत नसल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. दरम्यान, मधुकर मोहिते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील करावाई सुरू असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी सांगितलं आहे. 

पैसे वाटप करत असल्याच्या आरोपात तथ्य नाही : रोहित पवार 

या संपूर्ण घडामोडींबाबत रोहित पवारांशी संबंधित कंपनीतील व्यक्तीकडून पैसे वाटप होत असल्याच्या आरोपांवर रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह केलं. संबंधित व्यक्ती हा माझ्याच कंपनीतील कर्मचारी असला पैसे वाटप करत असल्याच्या आरोपात तथ्य नाही. व्हायरल व्हिडीओबाबत रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. संबंधित प्रकार हा ठरवून केला असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. संबंधित व्यक्ती हा कारखान्याचा कर्मचारी असून शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या कुठल्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी काम करणारा व्यक्ती आहे. संबंधित घटनेबाबत शहानिशा करूनच सर्वांनी बोलावं. कर्मचारी मोहिते यांच्याकडून दबाव तंत्रातून चुकीच्या गोष्टी लिहून घेतल्या आहेत. कारखान्याचे कर्मचारी मोहिते यांच्याकडे अतिशय कमी पैसे होते, पण जास्त पैसे असल्याचं लिहून घेण्यात आलं. राम शिंदे यांच्या जवळच्या महेंद्र मोहोळकर या व्यक्तीनं माझे कर्मचारी मोहिते यांना पकडलं. महेंद्र मोहोळकर या व्यक्तीवर अनेक कलमांनुसार गुन्हे दाखल आहे. मारहाण आणि चोरीचे गुन्हे महेंद्र मोहोळकर यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. माझ्या पदाधिकारी , कार्यकर्त्याला काही झालं तर प्रशासनच जबाबदार असेल. भाजपचे लोक खालच्या लेव्हलला गेले आहेत. भाजपच्या राजकारणामुळे लोक मतदान करण्यासही घाबरतील, असं रोहित पवार म्हणाले. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.