Eknath Shinde : दीक्षाभूमीवर आल्यावर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते
esakal December 22, 2024 09:45 AM

नागपूर : ‘‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करून प्रेरणा व नवी ऊर्जा मिळते. दीक्षाभूमीला आल्यानंतर नेहमीच वेगळी अनुभूती व समाधानही मिळते,’’ अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे व्यक्त केल्या.

दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी बुद्ध प्रतिमा व बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेऊन अभिवादन केले. मंत्री दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत, प्रताप सरनाईक, योगेश कदम, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, स्मारक समितीचे राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की दीक्षाभूमी ही तप आणि आदर्शाची भूमी आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन देश-विदेशातील अनुयायी येथे येतात व प्रेरणा घेतात. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच देशाचा व राज्याचा कारभार चालत आहे.

बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यांना न्याय देणार व जनसेवेला बळ देणारे आहेत. राज्य सरकारच्या वतीने तालुकानिहाय संविधानभवन बांधण्यात येत आहेत. तसेच चैत्यभूमीवर जागतिक दर्जाचे स्मारक बांधण्यात येत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.