Dhananjay Munde post on social media as soon as the account allocation was announced PPK
Marathi December 22, 2024 03:24 PM


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे खातेवाटप अखेर जाहीर झाले आहे. शनिवारी (ता. 21 डिसेंबर) नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या सांगतेनंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. ज्या गृहखात्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते, ते खाते फडणवीसांनी आपल्याचकडे ठेवले आहे. त्यामुळे शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यावर समाधान मानावे लागले आहे. तर उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, सध्या चर्चा सुरू आहे ती, मंत्री धनंजय मुंडे यांची. कारण राज्यात गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे नाव आरोपींचे निकटवर्तीय म्हणून घेतले जात आहे आणि तरी देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. इतकेच नाही तर मुंडे यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं देण्यात आले आहे. (Dhananjay Munde post on social media as soon as the account allocation was announced)

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी X या सोशल मीडिया साइटवरील अधिकृत अकाउंटवरून याबाबतची पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या या पोस्टमधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. तर, त्यांना दिलेली जबाबदारी ते चोखपणे पार पाडतील, असेही त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

– Advertisement –

हेही वाचा… Atul Subhash Suicide Case : निकिताची आई बनली मंथरा, सुभाष आत्महत्याप्रकरणाची दुसरी बाजू

राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी मिळताच मंत्री धनंजय मुंडे यांनी पोस्ट शेअर करत म्हटले की, “राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, उपमुख्यंत्री तथा आमचे नेते अजितदादा पवार, आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार प्रफुल्ल पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन.” असे त्यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.

– Advertisement –

सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंची चर्चा…

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशातही पाहायला मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेवरुन धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड खरा सूत्रधार असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेऊ नका, अशी मागणी मस्साजोग गावकऱ्यांकडून करण्यात येत होती. तर अजित पवार यांनी शनिवारी (ता. 21 डिसेंबर) मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तेव्हाही गावकऱ्यांनी मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. परंतु, सरकारने गावकऱ्यांची मागणी डावलत मुंडेंचा मंत्रिमंडळातही सहभाग करून घेतला आणि त्यांच्याकडे एका चांगल्या खात्याची जबाबदारी सुद्धा दिली.


Edited By Poonam Khadtale





Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.