- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com
तमाम ख्रिश्चन बंधू-भगिनींना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या येशूमुळं आपल्याला हा सण मिळाला त्यांच्या चरित्रातून आजच्या पिढीनं काय शिकायचं? हा विचार करत असताना येशू ख्रिस्तांचं जीवन या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणादायी ठरू शकते. प्रभू येशूंना फक्त एका धर्मापुरता बांधून न ठेवता त्यांची शिकवण अखंड मानवजातीलाच दिशादर्शक आहे.
आपल्या महाराष्ट्रात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांनी मानवजातीच्या उद्धारासाठी काम केलं, तरी त्याच मानवजातीकडून त्यांना कधी काळी त्रास भोगावा लागला. प्रभू येशूचा कालखंड फार जुना असला, तरी चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीला विरोध होतो, त्रास होतो, वेळप्रसंगी आत्माहुती द्यावी लागते, हे खूप पूर्वीपासून चालत आलंय.
माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत नेहमीच संकटात सापडतो. सुरुवातीला आपण संकटांशी सामना करतो पण एक वेळ येते जेव्हा आपल्याला कुणाचीतरी मदत हवी असते. अशावेळी जो कोणी मदतीला धावून येऊन आपल्याला संकटातून बाहेर काढतो, आपले दुःख कमी करतो तोच आपला तारणहार असतो. प्रभू येशू सुद्धा तारणहार म्हणूनच जन्माला आले होते पण तत्कालीन यहुदी लोकांनी त्यांना नाकारले.
त्या वेळच्या राजसत्तेने त्यांना वधस्तंभावर खिळे ठोकून लटकवले. वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या वर्षात त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले परंतु या येशूंनी दिलेली शिकवण ख्रिस्त धर्मीयांसाठी करोडो वर्षांचा अमूल्य ठेवा आहे. त्यांचा विचार आणि शिकवण आत्मसात करायला आता त्यांच्या शरीराची गरज नाही कारण मृत्यूनंतर तोच येशू सर्वांच्या हृदयात अजरामर झाला.
येशूंचा जन्म झाल्यानंतर ती बातमी साऱ्या जगात पसरली. ख्रिसमसच्या ताऱ्याला बघत बघत जे तीन बुद्धिमान बेथलहेमच्या दिशेने गेले. त्यांनी बालयेशूला भेटून तोच यहुदीचा राजा होणार असल्याचे भाकीत केले. जशी भीती कंसमामाला श्रीकृष्णाच्या जन्माची होती, तशीच भीती यहुदी साम्राज्याचा राजा हेरॉल्डला येशूंची होती. पुढे प्रदीर्घ उपवासानंतर येशूंनी उपदेश करण्यास सुरुवात केली.
देवाची मनापासून प्रार्थना करा, चुकीचे प्रायश्चित्त घ्या, शेजाऱ्यांशी प्रेमाने वागा. पुढे त्यांनी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी जेरुसलेमच्या दिशेने यात्रा सुरू केली. जसजसा त्यांच्या विचारांचा प्रसार होत गेला, तसतसाच काही पापी लोकांचा त्यांना विरोध वाढत गेला. कालांतराने त्यांना अटक करून जेरुसलेमच्या रस्त्यावरून त्यांना खांद्यावर क्रॉस ठेवून ओढायला लावले. त्यांना मारहाण करण्यात आली आणि अखेर गावाबाहेर त्याच क्रॉसवर हाता-पायांना खिळे ठोकून त्यांना मृत्युदंड देण्यात आला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र वाचतानाही प्रभू येशूंना झालेल्या त्रासाची कल्पना करता येऊ शकते. छत्रपती संभाजी महाराजांना देखील ४० दिवसांच्या अमानुष छळानंतर मृत्यूला सामोरे जावे लागले. संभाजी महाराजांचे चरित्र वाचलेल्या प्रत्येकाच्या निदर्शनास हे साम्य येईल.
काही माणसं मेल्यावर अमर होतात पुन्हा कधीच न मरण्यासाठी... तसेच प्रभू येशू अमर झालेत. शरीर क्षणभंगुर आहे, त्याला जगण्याच्या मर्यादा आहेत पण विचारांना मृत्यू नसतो. जोपर्यंत अनुयायी जिवंत आहेत, तोपर्यंत विचार पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत जातात. प्रभू येशूंनी दिलेला शांतीचा संदेश, भक्तीचा संदेश पुढे ठेवून जाणं हेच आपलं कर्म आहे.
हजारो वर्षांपूर्वी माणूस म्हणून आपण काय होतोत, तेव्हा लोकसंख्या किती होती? दळणवळणाची साधने होती का? विचारांच्या प्रसारासाठी अनुकूल वातावरण होते का? यातलं काहीही नसताना येशूंनी सांगितलेला विचार आणि तत्त्व अजूनही हजारो पिढ्यांमधून झिरपत झिरपत एकविसाव्या शतकापर्यंत येऊन पोहोचले, यातच त्यांची शक्ती अनुभवता येऊ शकते. पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी समाजात असतात.
यांपैकी पुण्याची निर्मिती करणे सोपे पण पाप संपुष्टात आणणे तितकेच कठीण. मानवजातीला पापांच्या अंधकारातून बाहेर काढून दिव्यत्वाचा प्रकाश बहाल करणारा येशू ईश्वर अंश असला, तरी त्यांनी एक सामान्य माणूस म्हणून जन्म घेऊन इथल्या लोकांच्या हृदयात प्रार्थना पेरली. आजमितीला जगभरात लाखो चर्च असतील पण त्या प्रत्येक चर्चमधील शांती अजूनही चांगल्या विचारांना प्रेरित करीत राहते. जगण्याची आणि जगवण्याची ऊर्जा देत राहते.
देवराज्याची संकल्पना मांडताना येशू सांगतात, की परमेश्वर माणसांच्या हृदयरूपी जमिनीत देवराज्याची वचने पेरत असतो. पेरलेल्या बियांची जशी रोग आणि कीटकांपासून काळजी घ्यावी लागते, तशीच राक्षसी प्रवृत्तीच्या विचारांपासून पेरलेल्या वाहनांची आपण काळजी घ्यायला हवी. एक छोटीशी बी आपोआप उगवून मोठ्या वृक्षात रूपांतरित होते तसेच हे देवराज्य निर्माण होणार आहे.
तुमचे प्रार्थनारूपी पाणी त्या बियांवर पडत राहायला हवे. परमेश्वराचे आमंत्रण स्वीकारून देवराज्यासाठी आपल्या मनाची मशागत करायला हवी. आपल्याला बी तयार करायचा नाही तर त्याने जे बीजरोपण केलंय त्याला फक्त प्रार्थनेने जोपासून वाढवायचे आहे. भविष्यात त्याची सावली आपल्या सर्वांना सुखावणारी असणार आहे.
देवराज्यातील आपला अनुयायी कसा असावा, त्याविषयी एकूण बारा दाखले देत येशू म्हणतात, मानवाने आपल्या मनाचे नूतनीकरण करावे, सर्वांना प्रकाश द्यावा, पृथ्वीचे मीठ बनावे, डोळस वाटाड्या बनण्यासाठी प्रथम स्वत:मध्ये सुधारणा करण्यास झटावे, चांगल्या झाडाप्रमाणे चांगली फळे द्यावीत, श्रद्धेच्या भक्कम पायावर आपल्या जीवनाची इमारत उभारावी, जीवनात उचित भूमिका घ्यावी, आज्ञाधारकपणे जगावे, चांगला शेजारी बनावे, नम्रता, नियोजन आणि नव्या-जुन्याची सांगड हे सद्गुण जोपासावेत.
जास्त काही नाही पण आपण आपल्या धावपळीच्या आणि व्यस्त आयुष्यात प्रभू येशूंची एवढी जरी शिकवण जोपासू शकलो, तरी आपल्याला देवराज्यात जगत असल्याची अनुभूती मिळेल.
जसे एखाद्या झाडाची सावली अनुभवायची असेल, तर ती त्या झाडापासून दूर उभा राहून अनुभवता येणार नाही. त्यासाठी त्या झाडाखालीच जाऊन उभे राहावे लागते तसेच मला सुद्धा या लेखाच्या निमित्ताने येशूंच्या सावलीत काही काळ घालवता आला. हा लेख लिहिण्यासाठी मी जवळपास महिनाभर येशूंचे विचार वाचत होतो.
याआधी वरवर माहीत असणारे विचार खोलात जाऊन पाहिल्यानंतर मलाही माणुसपणाचे दर्शन घडले. ईश्वराच्या परम सान्निध्यात राहण्यासाठी, आत्मिक समाधान प्राप्त करण्यासाठी, अशक्य ते शक्य करण्यासाठी, दुःखाचे निर्दालन करण्यासाठी आणि पापांतून मुक्त होण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना हेच प्रभावी औषध आहे.
(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)