- सखाराम बोरकर, saptrang@esakal.com
साहित्य अकादमीच्या वतीने देशभरातल्या विविध भाषांमधल्या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. मराठीतून डॉ. सुधीर रसाळ यांची तर कोकणीमधून मुकेश थळी यांची निवड करण्यात आली. या दोन दिग्गजांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध...
वाणी आणि लेखणीची उपजत देणगी असलेले साहित्यिक फार विरळ. या जोडीला व्यासंगाची ओढ, संगीत-गणित या विषयांची सखोल गती असलेले साहित्यिक तर अगदी अल्प. असे बहुभाषक, बहुश्रुत, बहुप्रसवा, बहुआयामी सरस्वती उपासक म्हणजे - मुकेश थळी. त्यांच्या सुंदर व्यक्तिमत्त्वाला अनेक लोभस रंगीत पाकळ्या. एक प्रकारचं विलोभनीय रसायनच. आकाशवाणीवर वृत्तनिवेदक - अनुवादक या सेवेतून ते गेल्या वर्षी निवृत्त झाले.
आपल्या अंगभूत, उपजत, भारदस्त, पहाडी, खणखणीत आवाजातील वृत्तनिवेदन, विशुद्ध कोकणी उच्चारांचा वस्तुपाठ यामुळे ''मुकेश थळी तुमकां प्रादेशिक खबरो दिता'' हे शब्द ऐकताच श्रोत्यांना आपल्या अंगात ऊर्जा खेळल्यासारखी वाटे.
थळींना यंदाचा साहित्य अकादमीचा कोकणीतील पुरस्कार त्यांच्या ''रंगतरंग'' या निबंध संग्रहासाठी घोषित झाला. त्यांच्या मधाळ लोकप्रिय स्वभावामुळे कोकणी चळवळीतील त्यांचं योगदान, साहित्य निर्मिती, कोकणी साहित्याचे इंग्रजी अनुवाद, शब्दकोश, विश्वकोश या क्षेत्रातील भरीव कार्य यांची मोजदाद करणं कठीण. पूर्णत्वाचा आणि उत्कृष्टतेचा ध्यास हा त्यांचा स्वभाव. आपला निबंध दहा वेळा तरी दुरुस्त करतील.
नाट्यसंहिता लिहून उत्कृष्ट संस्थेला देतील. अधूनमधून तिथं तालमीला जाऊन उच्चार पाहतील, नटांना सांगतील, सुधारतील. ते नाटक आविष्कृत होईपर्यंत थळीबाब त्याच धुंदीत, त्याच मस्तीत, त्याच आनंदात तरंगत राहतील. त्यांच्या नाट्यसंहितेत कंसातील रंगसूचना वाचाव्यात. मध्य, लय, संतूर किंवा हंसध्वनी रागातील बासरी. अशा अनेक सूचना.
मानकुराद आंब्याची कोय पांढरीफटक होईपर्यंत तो मगज खातात, तसे हे नाटककार त्या नाटकाचा सर्वाधिक आनंद घेतील. त्यांनी मौलिक नाटके लिहिली. त्यांना बक्षिसे मिळाली. ''एवं इंद्रजित'' हे बादल सरकारांचं नाटक त्यांनी इतक्या लयदार शैलीदार संवांदांसहित अनुवादित केलं की कोकणी रंगमंचावरील एक श्रेष्ठ नाटक ठरलं.
मुकेशरावांकडं एक झपाटलेपण आहे. कुठलीही गोष्ट एकदा हातात घेतल्यावर त्यात ते बुडून रमून जातात. त्यांच्याकडं जीवन अर्थपूर्ण व परिपूर्ण करण्याचं विद्यार्थीपण आहे. जीवनाविषयी जिज्ञासा, कुतूहल, गुणग्राहकता व असोशी आहे. त्यातूनच त्यांचा पिंड आध्यात्मिकतेकडे कललेला आहे. थळींचे ललित निबंध काव्यात्म रसाने ओतप्रोत ओसंडून, ओथंबून भरलेले दिसतात. भाषा प्रवाही व वाक्यं लहान लहान बाहुल्यांसारखी. कठीण लिहिणं सोपं व सोपं लिहिणं कठीण, हा मंत्र ते आम्हा मित्रांना सांगत असतात.
सुटसुटीत, प्रासादिक, सोपी, तेजस्वी भाषा हे थळी यांच्या निबंधांचं वैशिष्ट्य आहे. रियाझी गाणं असावं तसं त्यांचं साहित्य. कुळागरे, डोंगर, झरे, देवळे आणि संगीत यांनी समृद्ध असलेल्या अंत्रुज महालातल्या प्रियोळ गावात मुकेशराव घडले. वयाच्या दहाव्या वर्षांपासून मुकेशराव लिहीत आहेत.
थळींना साहित्य अकादमी पुरस्कार फार पूर्वी मिळायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटली. ती सार्थ होती. पण या अवलिया साहित्यिकांना त्याची कसलीच खंत नाही. प्रसिद्धिपराङ्मुख वृत्ती व कोकणी भाषेची मनोभावे सेवा हाच त्यांचा ध्यास. संख्यात्मक आणि गुणात्मक स्तरावर सातत्याने साहित्य निर्मिती करायचा त्यांनी विक्रम केलाय.
चतुरस्र बुद्धिमत्तेचे थळी हे १९७९ मध्ये गोवा शिक्षण मंडळाच्या एसएससी परीक्षेत ते दुसरा क्रमांक घेऊन चमकले. गणित हा तर त्यांचा हातचा मळ आणि खेळ. त्यांनी या विषयात पदवी घेतली. गणित अध्यापन केले. पण साहित्य, भाषा यांचं असोशीचं प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. प्रियोळला आजोळी शिकत असताना रवींद्र केळेकर यांच्या छत्रछायेत ते वाढले. तिथं त्यांना आयुष्याला पुरेल इतकं साहित्याचं बाळकडू मिळालं.
प्रचंड अशा ग्रंथालयात वावरताना त्यांना रवींद्रबाबांनी हिंदी, इंग्रजी, मराठी साहित्यिकांचे ग्रंथ वाचण्यासाठी मार्गदर्शन केलं. मुकेशरावांनी गोवा विद्यापीठात कोकणी विश्वकोश विभागात संशोधन सहायक म्हणून सहा वर्षे सेवा दिली. नंतर ते पणजी आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून गेले.
आकाशवाणीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या साहित्याला बहरच येत गेला. ऋतूवर ऋतू फुलावेत तसे सृजन ऋतू फुलत गेले. हल्लीच त्यांचं ''शिवरंजनी'' हे ललित निबंधांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. २४ निबंध असलेल्या या पुस्तकात त्यांनी कोकणी निबंध प्रकाराला फार उंचीवर नेलं आहे.
सज्जन, निर्मळ हृदयाचा, सत्यनिष्ठ व अगोदर मनुष्यत्व जपण्याची साधना व नंतर लेखकपणाची असं मानणारा व जगणारा हा साहित्यिक. इंग्रजीवर प्रभुत्व. त्यांनी कित्येक कोकणी कथा इंग्रजीत केल्या. त्या प्रतिष्ठेच्या मासिकात प्रकाशित झाल्या आहेत. मुकेशचं सख्य मैत्र आम्हाला लाभलं हे आमचं भाग्य.
नाट्य संहिता, एकांकिका असो, तो विद्यार्थीपणाने आम्हा अनेकांना पाठवून प्रकाशित होण्याआधी सल्ला घेतो. हा त्याचा मोठेपणा आणि उत्कृष्टपणाचा आणि परिपूर्णतेचा ध्यास. मुकेशरावांनी कोकणीची विविध दालनं समृद्ध केली आहेत. सोवळं नेसून गर्भागारात देहभान विसरून पूजा उपासना करणारा पुजारी असतो, तसे मुकेशराव हे कोकणीचे, कलेचे, साहित्याचे पूजक आहे.
संगीत हे या थळी घराण्याचं बलस्थान होय. मुकेशरावांना शास्त्रीय संगीताची चांगली माहिती व आवड आहे. मला साहित्यापेक्षाही संगीत आवडतं असं ते हसत म्हणाले. संगीत ऐकल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही, असंही ते म्हणतात. त्यांच्याकडे पुस्तकांचं व संगीताचं भलं मोठं संकलन आहे.
स्पष्टता हा शब्द त्यांच्या तोंडातून मी अनेकदा ऐकतो. विचार, लेखन अगदी स्पष्ट असावं अशी त्यांची धारणा. स्पष्टतेची साधना हवी हे त्याचं म्हणणं. मुकेशरावांचं हृदय शुचिर्भूत स्वच्छ. कणभर प्रेम त्यांना द्या, मणभर-टनभर प्रेम ओतून जीव लावणारा हा सन्मित्र. सज्जन. बुद्धिबळ या खेळात महाविद्यालयात चमकणारा हा अष्टावधानी जीवन पथिक. मुलाखतकार, क्वीज मास्टर, निवेदक या क्षेत्रातही मुकेशरावनी आपला अमीट ठसा उमटवला आहे.
हा सत्याचा पाईक फक्त सत्याला घाबरतो. जीवनाकडं बघण्याची मुकेशरावांची गंभीर दृष्टी सखोल वेध घेणारी आहे. त्यांच्या काही निबंधांना यामुळेच विचारांची डूब आहे. ते मला एकदा म्हणाले – लायफ म्हणजे अपघात नव्हे. लायफ हे एक गिफ्ट. रुमी व कबीर यांचं काव्य आणि तत्त्वचिंतन, बादल सरकारची नाटके, अनेक विदेशी नाटके या संदर्भात मुकेशराव हे ज्ञानभांडार आहेत. हे एक चालते बोलते ज्ञानकोश.
त्याचे साहित्यिक गुरु ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर याच्या शताब्दी वर्षात मुकेशरावांना केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळावा, हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. अविरतपणे साहित्य निर्मिती, कोकणीची सेवा हे ज्यांच्या जीवनाचं मिशन आहे, त्यांच्या हातून आणखीन सशक्त साहित्यकृती निर्माण होतीलच, हा गोवेकरांचा विश्वास आहे.
(लेखक ज्येष्ठ समीक्षक आहेत.)