मराठी समीक्षेचा मानबिंदू
esakal December 22, 2024 11:45 AM

- प्रा. विश्वास वसेकर, saptrang@esakal.com

साहित्य अकादमीचे वाङ्मयपुरस्कार प्रतिवर्षी प्रत्येक भाषेतील एकाच पुस्तकाला मिळतात. मागील पाच वर्षांतील पुस्तके त्यासाठी विचारात घेतली जातात. समीक्षा या प्रकाराच्या वाट्याला हा सन्मान क्वचितच येतो. या वर्षीच्या २१ पुरस्कारांमध्ये केवळ तीन समीक्षाग्रंथ आहेत.

त्यात मराठीचे ज्येष्ठ-श्रेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथाला हा बहुमान मिळाला याचा आनंद जसा त्यांच्या वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांना झाला असेल, तितकाच समीक्षक या फार लोकप्रिय नसलेल्या अल्पसंख्याक जमातीला होईल. कारण यापूर्वी ग. त्र्यं. देशपांडे (१९५०), बा. सी. मर्ढेकर (१९५६), डॉ. रा. भा. पाटणकर (१९७५), प्रभाकर पाध्ये (१९८२), विजया राजाध्यक्ष (१९६३) आणि डॉ. सदानंद मोरे (१९९८) या समीक्षकांनाच फक्त हे भाग्य लाभलंय.

म्हणजे सुमारे ७१ वर्षांत मराठीच्या ललित लेखकांना ६४, तर समीक्षकांपैकी फक्त सहा-सात जणांच्या वाट्याला हे पुरस्कार लाभले. या पार्श्वभूमीवर गुरुवर्य डॉ. सुधीर रसाळ यांच्या समीक्षेचा झालेला सन्मान अधिक आनंद देणारा आहे.

नव्वदीच्या घरात असणाऱ्या डॉ. सुधीर रसाळ यांनी निवृत्तीनंतर समीक्षा लेखनाला वाहून घेतलेले आहे. निवृत्तीपूर्वी त्यांचा मौज प्रकाशनानं काढलेला ‘कविता आणि प्रतिमा’ हा ग्रंथ समीक्षेतला मापदंड ठरला आहे. या ग्रंथाला त्या वर्षीचं साहित्य अकादमी मिळायला हवं होतं. असो. या ग्रंथानंतर त्यांचे ११ महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध झाले.

त्यांतील ‘वाङ्मयीन संस्कृती’, ‘ना. घ. देशपांडे यांची कविता’ (२०१०), ‘मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप’, ‘मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण’, ‘मर्ढेकरांचे कथात्म वाङ्मय’ (२०१५), ‘कविता निरुपणे’, ‘भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा’ (२०१८), ‘काव्यालोचना’, ‘समीक्षा आणि समीक्षक’ (२०२१), ‘कवितायन’, ‘विंदा करंदीकरांची कविता’ (२०२२) या ग्रंथांनंतर अलीकडे त्यांचा ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार देताना काय निकष लावते त्यावर भाष्य करता येणार नाही, ते औचित्याला धरून नाही. पण पुष्कळदा घोळ होतो हे नक्की. कवी ग्रेस यांच्या कवितेला पुरस्कार द्यायच्या ऐवजी त्यांच्या ललित गद्याला पुरस्कार दिला गेला. डॉ. रसाळ यांचे प्रत्येक पुस्तक तोलामोलाचे आहे. या वर्षीचा पुरस्कार ‘कवितायन’ या त्यांच्या महान ग्रंथाला मिळायला हवा होता.

करंदीकरांच्या कवितेचं नवं आकलन त्यात मांडलं आहे. त्याऐवजी तुलनेनं करंदीकरांच्या गौण साहित्याची मीमांसा करणाऱ्या ग्रंथाला दिला. कदाचित ‘विंदा’ हे देशभरातल्या साहित्यातील परिचित आणि सन्माननीय नाव आहे; परंतु त्यांच्या कवितेची समीक्षा करणाऱ्या ग्रंथावर ''विंदा’ हे नाव नाही. म्हणून ‘विंदाचे गद्यरूप’ हे नाव असणाऱ्या ग्रंथाला तो दिला. असू द्या. गुरुवर्यांच्या एकूण तपश्चर्येचे हे फळ त्यांना मिळाले, हे महत्त्वाचे!

डॉ. रसाळ यांचे समीक्षालेखन हा एक सुखावह चमत्कारच म्हटला पाहिजे. विशिष्ट लेखकाचा अभ्यास या क्षेत्रात त्यांनी मोलाची भर घातली आहे. त्यांच्यापूर्वीचे लेखकाभ्यास (उदा. वा. ल. कुलकर्णी) हे त्या लेखकाच्या साहित्यकृतींची सुटी-सुटी परीक्षणं एकत्र करून काढलेली पुस्तकं होती. लेखकाभ्यास करणाऱ्या समीक्षकाला त्या लेखकाच्या वेगवेगळ्या कलाकृतींना जोडणारे सूत्र ठरवता किंवा शोधता आलं पाहिजे.

हे सूत्र म्हणजे त्या लेखकाचे चरित्र हे निश्चितच असू शकत नाही. बा. भ. बोरकर यांच्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंधलेखन करताना हे सगळे काम पूर्ण होईपर्यंत बोरकर यांना भेटायचे नाही, अशी त्यांनी मला घातलेली अट योग्यच होती. (कदाचित ती पाळू न शकल्याने मी पीएच.डी. होऊ शकलो नाही.)

डॉ. सुधीर रसाळ यांच्या मते त्या लेखकाची ‘संवेदनशीलता’ हे त्याच्या सुट्या-सुट्या कलाकृतींना जोडणारे सूत्र असू शकते. ‘संवेदनशीलता’ या वाङ्मयीन संज्ञेसाठी दिलीप चित्रे यांनी संवेदनस्वभाव ही संज्ञा वापरली आहे. ते सूत्र घेऊन रसाळ सरांनी ना. घ. देशपांडे, मर्ढेकर, पु. शि. रेगे आणि करंदीकर या कवींचे सुंदर आणि निर्णायक आकलन मांडले आहे. डॉ. रसाळ आपल्याला या कवींच्या कवितासौंदर्याच्या मर्मस्थानापर्यंत नेऊन सोडत नाहीत, तर त्या-त्या कवींचं मराठी कवितेतील वेगळेपणाला अधोरेखित करतात.

ज्याला साहित्य अकादमी मिळायले पाहिजे, त्या ‘विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथाचा थोडा विस्तारानं परिचय करून घेणं औचित्यपूर्ण ठरेल. या ग्रंथातील आपल्या विवेचनाचे सरांनी दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात गो. वि. करंदीकरांची समीक्षा, तर दुसऱ्या भागात त्यांच्या लघुनिबंधांची चर्चा केली आहे. पहिल्या भागानं या पुस्तकाच्या १३६ पैकी ११० पृष्ठे व्यापली आहेत, तर दुसरा भाग सुमारे २४ पृष्ठांएवढा छोटा आहे.

करंदीकर इंग्रजीचे प्राध्यापक होते. पाश्चात्त्य काव्यशास्त्र, समीक्षा सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्राचा करंदीकरांचा गाढा व्यासंग होता. करंदीकरांची मराठी समीक्षा ‘परंपरा आणि नवता’ आणि ‘उद्गार’ या दोन पुस्तकांत एकवटली आहे. ललित साहित्यासंबंधीचे सिद्धांत करंदीकर यांनी मुळात इंग्रजीतून मांडले आहेत. करंदीकरांच्या इंग्रजीतील साहित्यविचारांचा आ. ना. पेडणेकर यांनी ‘साहित्यमूल्यांची समीक्षा’ (२००४) या ग्रंथात अनुवाद केला आहे.

‘विंदांची गद्यरूपे’ या ग्रंथाच्या पहिल्या भागात डॉ. रसाळ यांनी त्यांच्या मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीतील साहित्यविचारांची विस्तृत चर्चा केली आहे. करंदीकरांच्या विचारांवर साम्यवादाचा एक प्रभाव आहे. त्यांच्या लेखनाचा हेतू आजच्या सामाजिक वास्तवाच्या मानवताविरोधी घटकांचे दर्शन घडवून त्यांत त्यांना अपेक्षित इष्ट परिवर्तन घडवण्याचा आहे. डॉ. रसाळ यांचा करंदीकरांच्या या भूमिकेला आक्षेप असावा असं दिसतं. त्यांच्या मते वाङ्मयकृतीकडे फक्त एक वाङ्मयकृती म्हणूनच पाहिले गेले पाहिजे. करंदीकर यांच्याबाबतीत हे घडत नसल्याची खंत रसाळ यांनी व्यक्त केली आहे.

या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात डॉ. रसाळ यांनी करंदीकर यांच्या लघुनिबंधांची चर्चा केली आहे. वाङ्मयाच्या इतिहासात एखाद्या वाङ्मयप्रकाराच्या स्वरूपात इतका मूलगामी बदल होतो, की त्याचं पूर्वीचं नावदेखील शिल्लक राहत नाही. मराठीमध्ये लघुनिबंध या वाङ्मयप्रकाराच्या बाबतीत असे घडले आहे. म्हणजे असे, की कादंबरीत कितीही परिवर्तने झाली तरी त्या प्रकाराचे नाव कादंबरीच राहिले.

लघुकथा, कविता, नाटक, एकांकिका यांच्याबाबतीतही हे म्हणता येईल; परंतु फडके, खांडेकर, काणेकर यांच्या लघुनिबंधाला एवढे कृत्रिम व तांत्रिक स्वरूप आले, की या लेखकांनीच त्याची मरणघटका जवळ आणून ठेवली. त्याउलट नंतरच्या दुर्गा भागवत, इरावती कर्वे, माधव आचवल, मधुकर केचे, ग्रेस आदींनी नवीनतेने आणि आशयाने रसरसलेला एवढा वेगळा प्रकार लिहिला, की त्याला ‘लघुनिबंध’ म्हणणे हा त्याचा अपमान वाटावा. परंतु डॉ. रसाळ करंदीकर यांच्या पदरात हे माप घसघशीतपणे टाकायला तयार नाहीत. शिवाय बदलत्या प्रकाराला आम्ही लोक ललित गद्य म्हणतो; पण रसाळसर निदान करंदीकर यांच्या वेळी तरी ललित लेख म्हणतात.

डॉ. रसाळ यांच्या मते, करंदीकर एक अपवाद वगळता आयुष्यभर रंजनपर लघुनिबंध लिहीत राहिले. कवितेमध्ये करंदीकर यांना जीवनाचे जे रूप जाणवले, तसे त्यांनी लघुनिबंधातून अभिव्यक्ती करायला हवे होते. कवितेमध्ये जाणीवपूर्वक नवे-नवे प्रयोग करणाऱ्या करंदीकर यांनी ललित गद्याच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करण्याचे लक्षात घेतले नाही.

त्यामुळे त्यांचे ललित लेख ‘ललित लेख’ न होता ‘लघुनिबंध’च राहिले, असे रसाळ म्हणतात. एकंदरीने आकाशाचा अर्थ (१९६०) या पुस्तकातला ‘तू वाहातो आहेस’ हा एकुलता अप्रतिम ललित लेख वगळता करंदीकर यांना याही क्षेत्रात फार मोलाची कामगिरी बजावता आली नाही, असा निर्वाळा रसाळ देतात.

डॉ. रसाळ हे स्वतः एक परिपूर्ण, समृद्ध आणि महान समीक्षक आहेत. त्यामुळेच इतरांच्या समीक्षेचे मूल्यमापन करताना त्यांना त्या समीक्षकाच्या उणिवा, मर्यादा किंवा चुका जाणवत राहणे स्वाभाविक आहे. याच कारणाने मर्ढेकर यांचा एक अपवाद वगळला, तर डॉ. रसाळ इतरांच्या (उदा. भालचंद्र नेमाडे) समीक्षेबद्दल असमाधानच व्यक्त करत आले आहेत. यामुळे विंदांचे गद्यरूप या ग्रंथात रसाळ यांची समीक्षा काहीशी नकारात्मक आहे.

साहित्य अकादमीने पुरस्कार देताना डॉ. रसाळ यांच्या पु. शि. रेगे यांच्यावरील ग्रंथाचा किंवा ‘कवितायन’ या ग्रंथाचा विचार करायला हवा होता. अकादमी पुरस्कार मिळाला म्हणून रसिकांनी किंवा अभ्यासकांनी रसाळ यांचा हा एकच ग्रंथ विकत घेऊन वाचला असता, तर त्यांचा गुरुवर्यांविषयी गैरसमज व्हायची भीती वाटते.

रसाळ यांचे कवितायन आणि पु. शि. रेगे, मर्ढेकरांच्या कवितेवरचे ग्रंथ सकारात्मक आणि रसिली समीक्षा म्हणून अप्रतिम आहे. रसाळ यांच्या साहित्य अकादमी पुरस्काराच्या निमित्ताने जर त्यांच्या एकूण समीक्षेचा गौरव करायचा असेल, तर त्याची सर्वच पुस्तके विकत घ्यावीत, असं सुचवावेसं वाटतं. अभ्यासकांसाठी तर पुढची २०० वर्षे ही समीक्षा चिरंजीव राहणार आहे.

(लेखक हे ज्येष्ठ साहित्यिक व कवी तसेच समीक्षक आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.