विखे आणि मुंडेंनी महत्त्वाची खाती गमावली, मंत्रिमंडळात उलटफेर समजून घ्या
esakal December 22, 2024 04:45 PM

राज्याच्या विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला. प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सरकार स्थापन करायला महायुतीला ११ दिवस लागले. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होत्या. सरकार स्थापनेच्या तीन आठवड्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात सगळेच मंत्री बिनखात्याचे होते. अधिवेशन संपताच खातेवाटप जाहीर करण्यात आलं. महायुतीत ज्या खात्यावरून इतके दिवस खातेवाटप रखडलं होतं ते गृहमंत्रीपद फडणवीसांकडेच कायम राहिलं. तर अजित पवार यांनी स्वत:कडे अर्थखातं राखण्यात यश मिळवलं. एकनाथ शिंदेंना गृहनिर्माण खात्यावर समाधान मानावं लागलं.

महायुतीने खातेवाटप जाहीर केलं त्यात आधीच्या सरकारमध्ये ज्यांच्याकडे खाती होती ती आता बदलण्यात आल्याचंही दिसतंय. तर ज्यांना डावललं त्यांचीही खाती काही नव्या चेहऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महायुती सरकारमध्ये महसूल खातं होतं. विखेंनी महसूल खातं गमावलं असून त्यांच्याकडे जलसंधारण खातं देण्यात आलंय. तर महसूल खातं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे याआधी कृषी खातं होतं. पण आता त्यांच्याऐवजी हे खातं माणिकराव कोकाटेंना देण्यात आलं. तर धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री करण्यात आलं आहे.

महिला मंत्र्यांकडे कोणती खाती?

महायुतीच्या सरकारमध्ये चार महिला मंत्री आहेत. यात पंकजा मुंडे यांना पर्यावरण व हवामान बदल आणि पशुपालन खातं दिलं आहे. तर आदिती तटकरे यांना महिला व बालविकास मंत्री करण्यात आलंय. माधुरी मिसाळ यांच्याकडे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्रीपद सोपवलंय. मेघना बोर्डिकर यासुद्धा राज्यमंत्री असून त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, उर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री पद दिलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.