Mahavitaran : महावितरणची लकी ड्रॉ योजना; ऑनलाइन बिल भरा आणि स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका
esakal December 22, 2024 04:45 PM

छत्रपती संभाजीनगर : महावितरणने ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्यासाठी लकी ड्रॉद्वारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत.

महावितरणच्या या योजनेसाठी ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा तीनपेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

ज्यांनी १ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑफलाइन भरणा केला आणि ऑनलाइन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही, अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे.

महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत.

योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदी ऑनलाइन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. वीज बिलाची किमान रक्कम किमान १०० रुपये असणे आवश्यक आहे.

रांगेची नको कटकट

ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाइल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रकमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्क्यांहून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.