मुंबई : ‘‘आदित्य ठाकरे यांनी उद्धव यांच्यावर दबाव आणून काँग्रेसबरोबर जायला भाग पाडले. भाजप-शिवसेना युतीही त्यांच्यामुळेच तुटली,’’ असा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.
ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात अनुदार उद्गार काढणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांना आम्ही मुंबईत येऊ दिले नव्हते. ही शिवसेनेची ताकद होती. आता काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. हे सर्व आदित्य ठाकरे यांच्या पोरकटपणामुळे घडले. त्यांनी जनतेमध्ये जायला शिकले पाहिजे.’’
गैरव्यवहाराचे आरोप फेटाळले ‘‘मी महाराष्ट्राचा पहिला शिक्षणमंत्री आहे ज्याने प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश देण्याचा निर्णय घेतला. गणवेशाची निविदा १३८ कोटी रुपयांची होते. आधी फक्त मागास आणि सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनींना गणवेश दिले जायचे. या निविदेमध्ये राज्य सरकारचे ११ कोटी रुपये वाचले आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळाला हे काम देण्यात आले. वीस हजार महिला गणवेश शिवण्याचे काम करतात. त्यांना याचा अनुभव नसल्याने गणवेश शिवण्याला उशीर झाला असावा, अशी माहिती देत केसरकर यांनी त्यांच्यावरील गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावले.
गणवेशाचेही पैसे खाल्ले : आदित्य ठाकरे
‘‘सरकारने गणवेश वाटपासंदर्भातील जुना निर्णय रद्द केला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गैरव्यवहार केला आहे. त्याची चौकशी व्हायला हवी. ही अनियमितता प्रशासकीय आहे की आर्थिक स्वरूपाची, हे तपासायला हवे. केसरकर यांनी गणवेशातून मलई खाण्याचा प्रयत्न केला,’’ असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.