नागपूर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच शनिवारी रात्री राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज, शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन, खाण आणि स्वातंत्रसैनिक कल्याण, तर मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या वाटपातही भारीभक्कम खात्यांमुळे सातारा जिल्ह्याचा वरचष्मा अधोरेखित झाला आहे.
अपेक्षेप्रमाणे गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण, नगरविकास आणि सार्वजनिक उपक्रम ही खाती देण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ आणि नियोजन खाते आपल्याकडेच ठेवण्याबरोबर राज्य उत्पादन व शुल्क हे महत्त्वाचे खातेही आपल्या पदरात पाडून घेतले आहे.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खाते देण्यात आले असून, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलस्रोत (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्रालय देण्यात आले आहे.
हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार देण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्रशिक्षण, तसेच विधिमंडळ कामकाज, गिरीश महाजन यांना जलस्रोत (विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहेत. इंद्रनील नाईक हे उद्योगमंत्री बनले आहेत.