Aaj Che Havaman (आजचे हवामान): राज्यात थंडीच्या लाटेसह काही भागात अवकाळी पावसाची शक्यता, IMD चा अंदाज
Aaj Che Havaman (आजचे हवामान): देशाच्या उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीची तीव्र लाट आहे. का ठिकाणी किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. तर काही ठिकाणी तापमानाचा पार शुन्याच्या खाली गेला आहे. या भागातून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील झाला आहे. महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यामध्ये थंडीची लाट कायम आहे आणि पुढचे दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. थंडीच्या लाटेसह काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
तीन दिवस थंडीची लाट
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. असे असले तरी काही भागामध्ये थंडीची लाट कायम आहे. येत्या 24 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहील असा अंदाज आहे. त्यानंतर 25 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत राज्यातील किमान तापमानात पुन्हा वाढ होईल. 29 डिसेंबरनंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमानातील ही वाढ दिलासादायक ठरेल. कारण राज्यात गेल्या काही दिवसात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिकांनी अनुभवली आहे. काही भागाच्या तापमानाचा पार घसरुन 5 अंशावर येवून पोहचली होता. यात उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक थंडीची लाट होती आणि आजही या भागात थंडीचा जोर कायम आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
राज्यात सध्या थंडीचा जोर असला तरी अवकाळी पावसाचे सावट देखील कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात 26 डिसेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. यासह पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज आहे.
पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची तीव्र लाट
देशातील इतर राज्याच्या हवामानाबद्दल विचार केला तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम आहे. या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने महाराष्ट्रातही गारठा वाढला आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.