Maharashtra Weather: पुढील ५ दिवस तापमानात मोठा बदल, कुठे पाऊस, कुठे थंडी, वाचा हवामानाचा अंदाज
Saam TV December 22, 2024 02:45 PM

आज पासून पुढील चार दिवस म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबरपर्यंत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटे पाचचे किमान तापमान भागपरत्वे सध्या सरासरीपेक्षा १ ते ४ डिग्री से. ग्रेडने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवत आहे. पण मुंबईसह कोकणात मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा १ ते २ डिग्री से. ग्रेडने खालावले असल्यामुळे मुंबईसह कोकणात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने तेथे अधिक थंडी जाणवत आहे.

पश्चिमी प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून, नाताळ सणात म्हणजे २५ ते २९ डिसेंबर (बुधवार ते रविवार) पाच दिवसा दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात, भाग बदलतं, ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही सध्या जाणवू लागली आहे. त्यातही विशेषतः गुरुवार दि. २६ ते शनिवार दि.२८ डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसात पावसाची ही शक्यता अधिक जाणवत आहे.

गहू, हरबऱ्या सारख्या पिकांना ह्या पावसाने लाभ होवू शकतो, असे वाटते. त्यामुळे ह्या पाच दिवसातील वातावरणातून, दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी मात्र ह्यावर्षी ढगाळ वातावरणामुळे अनुभवता येणार नाही, असे वाटते. मात्र वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार दि.३० डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा चांगल्या थंडीची लाट असणार आहे.

सध्या च्या किनारपट्टीसमोर, दक्षिणोत्तर उभ्या लंबवर्तुळाकार समुद्री क्षेत्रात, समुद्रसपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत, अरबी समुद्रात, असलेल्या आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून, दक्षिणी(दक्षिणेकडून उत्तरेकडे) वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संपूर्ण कोकण, खान्देश व नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व छ.सं.नगर, जालना अशा एकूण १९ जिल्ह्यात अरबी समुद्रावरून प्रचंड आर्द्रता लोटली जात आहे. त्यामुळे ह्या १९ जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबरपर्यन्त सकाळच्या वेळेस धुके पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित सहा असे एकूण १७ जिल्ह्यात मात्र उत्तरी( उत्तरेकडून दक्षिणेकडे) वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यामुळे तेथे मात्र माफक थंडी जाणवणारच आहे, असे वाटते. कांदा, गहू, हरबरा पिकावर अळी, किडी, बुरशी, माव्याचे आक्रमण होवु शकते. तर किड व बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्याव्या लागण्याचीही शक्यता आहे.

फुलोऱ्यातील पिकांच्या परागीभवन व घाटे अवस्थेतील दाणाभरणीवर विपरित परिणाम होवू शकतो. प्रकाशसंस्लेषण अभावी अन्नद्रव्याच्या अपुऱ्या पुरवठ्यातून पिके कोमेजणे तसेच त्यांच्या वाढीवर, शाखीय डाफळणीवर विपरित परिणाम होवु शकतो. घड तयार होत असणाऱ्या द्राक्षांच्याबागेत दमट हवामानाचा विपरीत परिणामही जाणवू शकतो. त्यामुळे ह्या चार दिवसात आवश्यक ती काळजी घ्यावी.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.