सोलापूर : महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात व नावीन्यपूर्ण उत्तम खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनीने रसमयी महिला बचत गट निर्माण केला आहे. स्वादिष्ट, रुचकर व खमंग खाद्य पदार्थांची निर्मिती या गटामार्फत असून नुकतेच या पदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
ज्ञान प्रबोधिनीच्या उपासना मंदिरात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर रसमयी खाद्यपदार्थ विक्री उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बँक ऑफ बडोदा रेल्वे लाईन्स शाखेचे मुख्य व्यवस्थापक अमित चौधरी यांच्या विक्री केंद्राचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बँक ऑफ बडोदाचे संयुक्त व्यवस्थापक विकास रोडगे, ज्ञानप्रबोधिनी सहकार्यवाह डॉ. अमोल गांगजी, मुख्याध्यापिका सुनीता चकोत आदी उपस्थित होते.
हे पदार्थ उत्तम तेल, कोणतेही रंगद्रव्य किंवा प्रिझर्वेटिव्ह न वापरता तयार करण्यात आले आहेत. या पदार्थातील घटकांची महितीदेखील या पदार्थाच्या पॅकिंगवर छापलेली आहे.
या पदार्थांसाठी मागणी नोंदवून पदार्थांचा आस्वाद घ्या व महिला सक्षमीकरणास साथ द्यावी असे आवाहन ज्ञान प्रबोधिनीच्यावतीने करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी अमेरिकेतील ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनचे साहाय्य लाभले आहे.
उत्कृष्ट प्रतीचे, नावीन्यपूर्ण, चवदार पदार्थ रसमयी महिला बचत गटातर्फे तयार होत आहेत. ज्ञान प्रबोधिनी-सोलापूरचे या गटास मार्गदर्शन व साहाय्य आहे. यामुळे गरजू महिलांना चांगला रोजगार मिळत आहे. तसेच उद्योग सुरू करण्याचे धडेदेखील मिळत आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांनी या पदार्थांचा आस्वाद घ्यावा.
- अंबिका म्याकल, मार्गदर्शिका, रसमयी महिला बचत गट