विश्वभूषण लिमये, सागर आव्हाड, साम टीव्ही
पुण्यातील पाटस येथे कृषी खत निर्मित प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा.लि. या कंपनीच्या नोंदणीकृत नावाचा आणि चिन्हाचा बेकायदेशीर वापर करण्यात आला. तसंच बनावट कृषी खताचा साठा आणि विक्री केल्याप्रकरणी पाटस येथील श्री सिध्देश्वर कृषी सेवा केंद्रावर छापा टाकण्यात आला. संतोष परशुराम ठोंबरे यांच्या ताब्यातून, एकूण १ लाख १७ हजाराचे बनावट खत जप्त करण्यात आलं असून, याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
बेकायदेशीर खत आणि कंपनीच्या नावाचा वापर केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा. लि. कंपनीचे विक्री अधिकारी वसंत पांडुरंग गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. येथे कंपनीचे प्रोडक्ट असलेले प्लॅन्टो नावाची बनावट खते विकली जात आहेत. याची माहिती कृषी खत निर्मिती प्रलशर बायो प्रोडक्ट प्रा. लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. कंपनीच्या अधिकार्यांनी बनावट खतांचा साठा आणि विक्रीची माहिती पाटस पोलीसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी श्री.सिध्देश्वर कृषी सेवा केंद्रावर छापा टाकला.
छापा टाकल्यानंतर पोलिसांनी आणि कंपनीच्या अधिकार्यांनी खतांची तपासणी केली. त्या ठिकाणी प्रलशर बायो प्रोडक्ट कंपनीने उत्पादन न केलेल्या परंतु कंपनीचे प्रोडक्ट प्लॅन्टो नावाचा वापर केलेले खत आढळले. न्यू प्लॅन्टो प्लस नावाच्या ५० किलो प्रत्येकी एक हजार रुपये किंमतीच्या ४८ पिशव्या, तसेच २५ किलो वजनाच्या प्रत्येकी ५०० रूपये किंमतीच्या १३८ पिशव्या आढळल्या. एकूण १ लाख १७ रुपयांचे बनावट खत असल्याचं आढळून आलं. हे बनावट खत ताब्यात घेण्यात आलं असून, या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
प्रलशर बायो कंपनीने उत्पादित न केलेल्या परंतु कंपनीचे प्रोडक्ट प्लॅन्टो नावाचा वापर करून, श्री सिध्देश्वर कृषी सेवा केंद्रानं बनावट खताची निमिर्ती केली. ग्राहकांची फसवणूक व कंपनीच्या नावाचा वापर केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर आरोपीने जीएसटीने खतांची खरेदी केली असल्याचे समोर आलं. अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला नोटीस पाठवली असून, लवकरच गुन्ह्याचा उलगडा करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.