संपूर्ण जगभरात लोकप्रिय ठरलेल्या कोरियन वेब सीरिज ‘स्क्विड गेम’ चा दुसरा सीझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पहिल्या सीझनच्या अभूतपूर्व यशानंतर, दुसऱ्या सीझनबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.
तीन वर्षांपूर्वी, 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर ‘स्क्विड गेम’ चा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. या सीरिजने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले. फक्त १२ दिवसांत या सीरिजने नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक लोकप्रिय सीरिजचा किताब मिळवला. ९ भागांच्या या सीझनने कोरियन एंटरटेनमेंटला नवा पैलू दिला.
स्क्विड गेम’ चा दुसरा सीझन उद्या, २६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. रात्री ३ वाजल्यापासून नेटफ्लिक्सवर या सीझनचे सर्व सात भाग एकत्र स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होतील. यामध्ये मुख्य भूमिका करणारे ली जंग-जे (सेओंग गि-हून) पुन्हा एकदा या धोकादायक खेळाला आव्हान देताना दिसतील.
यावेळी त्याचे उद्दिष्ट ‘स्क्विड गेम’ कायमचे संपवण्याचे आहे. यासाठी तो रेड आणि ग्रीन लाईटसारख्या नव्या आव्हानांना सामोरे जाईल. त्या उद्दिष्टांना ते पूर्ण करू शकतात की नाही, हे पाहणे मनोरंजक ठरेल. दुसऱ्या सीझननंतर ‘स्क्विड गेम’ चा तिसरा आणि शेवटचा सीझन २०२५ मध्ये प्रदर्शित होईल, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.