चौथ्या कसोटी सामन्यात भारताला नाणेफेकीचा कौल गमवणं चांगलंच महागात पडल्याचं दिसत आहे. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांची चांगलीच गोची झाली. इतकंच भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहही काही खास करू शकला नाही. १९ वर्षीय सॅम कोनस्टास याने पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतकी खेळी करत भारताला दणका दिला. उस्मान ख्वाजासोबत सलामीला आलेल्या कोनस्टासने आक्रमक खेळी करत भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. इतकंच काय तर जसप्रीत बुमराहलाही सोडलं नाही. ज्या जसप्रीत बुमराहला कसोटीत षटकार मारणं कठीण होतं. त्याला दोन षटकार मारत आपला हेतू काय ते स्पष्ट करून दिलं. सॅम कोनस्टासने ५२ चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकाराच्या मदतीने अर्धशतकी खेळी केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिल्याच दिवशी बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे.
कोनस्टास हा ऑस्ट्रेलियासाठी दुसरा तरुण फलंदाज ज्याने अर्धशतकी खेळी केली. यापूर्वी इयान क्रेगने १९५३ मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्ध १७ वर्षे आणि २४० दिवसांचा असताना अर्धशतकी खेली केली होती. आता सॅम कोनस्टास या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १९ वर्षे आणि ८५ दिवसांचा असताना अर्धशतकी खेली केली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत बुमराहच्या नावावर एक विक्रम होता. त्याने ४११६ चेंडू टाकत एकही षटकार दिला नव्हता. मात्र चौथ्या कसोटी सामन्यात त्याच्या या कामगिरीला कोनस्टासने ब्रेक मारला आहे. शेवटचा षटकार जानेवारी 2021 ला पडला होता. ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून ग्रीनने सिडनीत मारला होता.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.