जपानपासून ते चीनपर्यंत अनेक देशाचा बर्थरेट हा झपाट्यानं कमी होत आहे. एकीकडे बर्थरेट कमी होत आहे तर दुसरीडे वृद्धांची संख्या वाढत आहे. बर्थरेट कमी झाल्याचा परिणाम हा तेथील तरुणांच्या संख्येवर झाला आहे, तरुणांची संख्या कमी झाली आहे, त्याचा परिणाम हा तेथील क्रयशक्तिवर झाला आहे.त्यामुळे जगातील असे अनेक देश आहेत जे आता त्यांची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी मुलं जन्माला घालावीत यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. पैसे वाटले जात आहेत, तर काही ठिकाणी एका पेक्षा अधिक लग्नाला देखील प्रोहत्साहन दिलं जात आहे.
आता बर्थरेट वाढवण्यासाठी रशियामधील एका राज्यानं तेथील नागरिकांना खास ऑफर सुरू केली आहे. पश्चिम रशियामध्ये असलेल्या या प्रांताचं नाव निजनी नोवगोरोड ओब्लास्ट असं आहे. येथील प्रशासनाकडून तरुणांना प्रत्येकी चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर येथील सरकार प्रत्येक मुला मागं बक्षिस म्हणून तेथील नागरिकांना 10 लाख रूबल म्हणजेच भारतीय चलनामध्ये आठ लाख रुपये देणार आहे. चार मुलं जर जन्माला घातली तर येथील नागरिकांना 32 लाख रुपये मिळणार आहेत.
रशियाच्या निजनी नोवगोरोड ओब्लास्ट गव्हर्नर ग्लेब निकितिन यांनी याबाबत घोषणा केली आहे, याबाबत रशियाच्या स्थानिक प्रसारमाध्यमातून बातमी प्रसारित करण्यात आली आहे.रशियामध्ये जन्मदराचं प्रमाण खूप कमी झालं आहे. इथे प्रत्येक महिलेमागे जन्मदर सरासरी 1.5 एवढाच आहे. हा जन्मदर अतिशय कमी असल्याचं मानलं जातं. त्यामुळे हा बर्थरेट वाढवण्यासाठी आता येथील सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
निजनी नोवगोरोड ओब्लास्टचे गव्हर्नर ग्लेब निकितिन यांनी याबाबत घोषणा करताना म्हटलं आहे की, प्रत्येक नागरिकांनी कमीत कमी चार मुलं जन्माला घालावीत. बर्थरेट वाढवण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत असून, प्रत्येक मुलाच्या जन्मामागे त्या कुटुंबाला 10 लाख रूबल मिळतील. ज्याची किंमत भारतीय चलनामध्ये आठ लाख रुपये एवढी होते, म्हणजे तेथील कुटुंबाला चार मुलांमागे 32 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.