Ghatkoper Accident : कुर्ल्यातील घटनेनंतर आता घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडले, एकाचा मृत्यू
Times Now Marathi December 28, 2024 06:45 AM

Ghatkoper Accident : घाटकोपरमध्ये एका टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात एका भरधाव बेस्ट बसने 12 ते 14 लोकांचा जीव घेतला होता, त्याचवेळी आता घाटकोपरमध्ये एका टेम्पोने 5 ते 6 पादचाऱ्यांना चिरडले आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरात ही घटना घडली आहे, ज्या मध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

सदर टेम्पोचा चालक उत्तम बबन खरात (वय 25) आहे, जो पोलिसांच्या ताब्यात आहे. अपघाताच्या तपासानुसार, टेम्पो चालवत असताना स्टेरिंगवरील ताबा सुटल्याने रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना टेम्पोची धडक लागली.



यामध्ये प्रीती रितेश पटेल (वय 35, राहणार भागीरथी चाळ, पारशीवाडी, घाटकोपर पश्चिम) या महिलेचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, रेश्मा शेख (वय 23), मारूफा शेख (वय 27), तोफा उजहर शेख (वय 38) आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख (वय 28) यांना गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांना राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



चालकाने मद्यपान केले असल्याचा स्थानिकांचा आरोपस्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, चालकाने मद्यपान केले होते, जो घटना घडवून आणण्यास कारणीभूत ठरला आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरात हा अपघात घडला, जिथे मोठे माशांचे आणि भाजी मार्केट आहे. टेम्पो भरधाव येत असताना बाजारात घुसला आणि त्याने स्टॉल्स उडवून पुढे जात पादचाऱ्यांना चिरडलं.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.