बंगळूर : कर्नाटकातील बंगळूरमध्ये विमानतळ सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ किलो हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
बँकॉकहून वेगवेगळ्या विमानाने आलेल्या दोन प्रवाशांकडून सुमारे ८० लाखांचा गांजा त्यांनी जप्त केला. हायड्रोपोनिक गांजा हा प्रयोगशाळेत पाण्यात पोषक द्रव्ये टाकून उगवला जातो.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) तीन आठवड्यांत या प्रकारच्या ड्रग्जची ही दुसरी जप्ती आहे.
याप्रकरणी दोघे अनुक्रमे १९ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी थायलंडहून येथे पोहोचले. प्रवाशांच्या प्रोफाईलिंगच्या आधारे त्यांना थांबवण्यात आले.
हे दोघेही मध्यमवयीन आणि भारतातीलच रहिवासी आहेत. एका प्रवाशाने त्याच्या ट्रॉली सुटकेसमध्ये गांजा लपवला, तर दुसऱ्याने तो त्याच्या बॅगेत आणलेल्या स्नॅक्सच्या पॅकेटमध्ये लपवला.