अभ्यास कर, वडिलांनी सुनावल्यानं 17 वर्षीय मुलीने घेतला गळफास
esakal December 28, 2024 09:45 PM

आई वडील ओरडल्यानं, किरकोळ गोष्टीला नकार दिल्याने मुलं टोकाचं पाऊल उचलल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. आता वडिलांनी अभ्यास कर म्हणल्यानं मुलीने गळफास घेऊन जीवन संपवल्याने खळबळ उडालीय. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी सांगितलं की, शुक्रवारी वडिलांनी ओरडल्यानं १७ वर्षीय मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली. इंद्रपुरमच्या एसीपींनी सांगितलं की, १७ वर्षीय मुलगी १२ वीमध्ये शिकत होती. दुपारच्या वेळेत ती झोपली होती. तिला अभ्यास करण्यासाठी वडील ओरडले होते.

अभ्यासासाठी वडील ओरडल्यानं नाराज झालेल्या मुलीने स्टोलच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतला. पोलिसांनी सांगितले की, जयवीर सिंह यांनी मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. त्यांनी तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ठाण्यात असाच प्रकार घडला होता. आई ओरडल्यानं १५ वर्षांची मुलगी घरातून बाहेर गेली होती. ९ दिवसांनी एका नाल्यात ती मृतावस्थेत आढळली होती. मोबाईल फोनवर जास्त वेळ घालवत असल्यानं आई ओऱडली होती. यामुळे ती घर सोडून गेली होती.

मुलगी डोंबिवलीत तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. तिच्या आईने पाच डिसेंबरला तिला मोबाईलवर जास्त वेळ घालवल्याबद्दल खडसावलं होतं. मोबाईलऐवजी अभ्यासावर लक्ष दे असं सांगितल्यानं मुलगी नाराज होऊन घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ९ दिवसांनी तिचा मृतदेहच आढळून आला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.