वेदना टिपणाऱ्या संवादी नजरेचं लेखन
esakal December 28, 2024 11:45 AM

- प्रदीप कर्णिक, karnikpl@gmail.com

‘अस्वस्थ मनाचे पडघम’मधील एकेक लेख तीन-साडेतीन पानांचा; पण त्यात लेखिकेची जी दृष्टी आहे ती आजच्या निर्ढावलेल्या जगात विशेष ठरते. छान छान स्थळांवर लेखिकांची नजर पडते. ती नजर त्या व्यक्तीशी बोलते, संवाद साधते...

मी अनेक नवोदितांची पुस्तके पाहिली, चाळली आणि वाचली आहेत; मात्र मनात घर करून बसतील-राहतील अशी पुस्तके फारच थोडी मिळाली. विद्या निकम यांचे ‘अस्वस्थ मनाचे पडघम’ पुस्तक त्याला अपवाद ठरले. ललित लेखन मराठीला अपरिचित नाही. मराठी ललित लेखनाची वाटचाल दीर्घ आहे.

प्रा. अनंत काणेकर, ना. ग. गोरे, दुर्गा भागवत, रवींद्र पिंगे आणि विजय तेंडुलकर यांच्यापासून अनेकानेक लेखकांनी आपल्या ललित लेखांनी मराठी मनाला भुरळ घातली आहे. प्रत्येकाची शैली निराळी. प्रत्येकाचा ललित लेखातला ‘मी’ निराळा. मला विद्या निकम यांच्या लेखनातल्या ‘मी’नेच लुभावून टाकलं.

‘अस्वस्थ मनाचे पडघम’ हे २८ स्फूट लेखांचे आणि १२५ पृष्ठांचं लहानसं पुस्तक आहे. एकेक लेख तीन-साडेतीन, चार पानांचा; पण त्यात लेखिकेची जी दृष्टी आहे ती आजच्या या निर्ढावलेल्या जगात विशेष ठरते, नजरेत भरते. ‘माणसं टिपणारी नजर’ या लेखिकेला प्राप्त झालेली आहे.

ही माणसंसुद्धा त्यांना प्रामुख्याने कुठे भेटतात, तर ‘ट्रेन’ नावाच्या विद्यापीठात. नारायण सुर्वे यांच्या विद्यापीठाची जणू ही दुरस्थ पद्धतीने प्राप्त केलेली एखादी पदवीच वाटावी. माणसं दिसणं, पाहणं आणि समजून घेण्याचं त्यांचं नातं थेट तेंडुलकर वा अवचट शैलीतलं वाटत राहतं (कोवळी उन्हे, रातराणी, माणसे इत्यादी) आणि हीच त्यांच्या लेखनातली शक्ती आहे. ती त्यांनी ओळखायला हवी, जोपासायला हवी. त्या शैली-पद्धतीचा पाठपुरावा करायला हवा.

किती किती छान छान स्थळांवर लेखिकांची नजर पडते. ती नजर नेमकी ती व्यक्ती, त्या व्यक्तीचा नेमका भाव पकडते. नुसता भाव पकडून ‘मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो’ असला कोरडा मनीभाव त्यात उरत नाही; तर ती ‘त्या’ नजरेला नजर देते. तिचं मन गप्प, शांत, स्वस्थ बसत नाही. ती त्या व्यक्तीशी बोलते, संवाद साधते.

नुसते संवाद साधत नाही तर त्यातूनच त्या व्यक्तीला, तिच्या मूक भावनेला ‘बोलतं’ करते, आधार देते, आधारभूत होते. प्रथम सहानुभूतीने, सहवेदनेने घातलेली हाक-साद ओळखीत रूपांतरित करते आणि त्या ओळखीला कधी तरी-केव्हा तरी मैत्रीचं रूप प्राप्त होतं. ‘माणसं टिपणाऱ्या नजरे’ची ही पुढची पायरी एका निर्माण झालेल्या नात्याला पूर्णत्व प्राप्त करून देते. या ललित लेखांची शक्ती, मूळ गाभा हाच आहे.

लेखिकेच्या नजरेने टिपलेली कितीतरी माणसं सामान्य, दुःखी-कष्टी, अबोल, कुढी, कष्टकरी वर्गातली आहेत. दोघांची - लेखिका व ती व्यक्ती यांच्यामधील नात्यांची विविध नाना रूपं पाहून आपण थक्क होतो.

उदा. गोधडी शिवणारी तन्मय झालेली झोपडपट्टीत राहणारी एक बाई, रेल्वेच्या डब्यात भेटलेली अनोळखी अश्लेषा व भ्रमणध्वनीवर बोलता बोलता आलेला हुंदका ऐकून सारे प्रवासी स्तब्धचकित असतानाही तिच्या पाठीवर हात ठेवून पाणी देणारी लेखिका व तिच्याशी संवाद साधून तिला दुखावेगातून बाहेर घेऊन येणारी लेखिकेची सहअनुकंपा, ट्रेनमध्येच भेटलेल्या पवार मॅडम आणि स्नेहा यांच्याशी निर्माण झालेलं संवाद नातं, रेल्वे डब्यात फिरून-फिरूनही विक्री न झालेली फेरीवाली...

तिच्या मुलाला शाळेच्या सहलीकरिता पाठवता यावं व किमान इतकी तरी विक्री होऊन फी जमा व्हावी, असं काकुळतीने दुसऱ्या फेरीवालीला सांगणारे तिचे शब्द कानावर पडताच दगडी मनाने ते बोल कानाआड न करणारी व तिच्याशी संवाद साधणारी लेखिका, रोजच्या भाजीखरेदीतून जयंती नावाच्या भाजीवालीला समजून घेऊन जाणून घेणारी, अत्यंत संवेदनशील मनाची माणूसपण जपलेली लेखिका, घरी येणाऱ्या केबल ऑपरेटर जफारशी अत्यंत अदबीने बोलणारी एक सहृदय स्त्री, रेल्वे डब्यातून उतरताना पुढ्यातच उभी असणारी आणि लवकर न उतरणारी व लेखिकेलाही उतरू न देणारी अंध रेणुका व तिचा अंध मित्र सुधाकर यांच्याकडे ‘डोळस’ नजरेने पाहणारी सहप्रवासी, चालण्याचा व्यायाम करताना बागेत थिजलेल्या नजरेने आणि गिळून टाकलेल्या शब्दांनी बसलेली एक बाई पाहून धाडस करून तिच्याशी आपणहून संवाद साधून झिडकारली गेलेली लेखिका, पुढे तिनेच बोलावल्यावर अत्यंत आनंदाने जाऊन तिच्याशी ‘बोलता बोलता’ मैत्री करणारी आणि पुढे त्यांच्या कुटुंबात संगीत चेतना निर्माण करणारी कलासक्त लेखिका, एका विधवा बाईने आणि तिच्या मुलाने धटिंगण दुकानदाराला वठणीवर आणून आपलं दुकान स्वबळावर स्वाभिमानाने चालवावं याने आश्चर्यचकित झालेली एक ग्राहक लेखिका, अनुराधा भोसले यांच्या कार्यकर्तृत्वाचा मांडलेला आलेख, एका हातात झाडूने रस्ता साफ करणारी आणि मान वाकडी करून भ्रमणध्वनीवर बोलणारी ई-महिला, कुष्ठरोगांवर औषध निर्माण करणाऱ्या ॲक्वथच्या पुतळ्याजवळ रोज कृतज्ञतापूर्वक दिवा लावणारी बाई अशी कितीतरी माणसे आपण या ललित लेखातून वाचतो. त्यापैकी ‘ॲलेक्स’, ‘हिरकणी’, ‘व्हॉयोलिन’ या तर हृदयस्पर्शी कथेचंच रूप घेतात.

लेखिका विद्या निकम यांच्या सहज नातेदृष्टीला साथ मिळते ती त्यांच्या वाचन संस्कारांची. लेखिका कवयित्रीही असल्याने कवीपाशी असणारी मृदू-कोमल वृत्ती त्या जपतात; सांगतात. ते सांगणंही कविता-पुस्तकांचा संदर्भ देत. काही कवितांचे संदर्भ तर इतके चपखल असतात, की तो क्षण काव्यमय होऊन तर जातो; पण वेदनेला आधारभूत ठरतो.

उदा. अश्लेषाचा हुंदका ऐकल्यावर तिला मोकळं करून रडूही दिल्यानंतर लेखिका रॉय किणीकरांच्या कवितेच्या चार ओळी तिला ऐकवते आणि सर्व रेल्वेचा डबा त्या काव्यावर हेलकावत राहतो. रेणुका-सुधाकर यांच्या अंधत्वाच्या दिव्यदृष्टीला त्या कुसुमाग्रजांच्या कवितेचा आधार पुरवतात. अत्यंत द्वेषातून झालेल्या नामवंतांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर त्या सानिया यांची कविता उद्धृत करतात.

शांताबाई शेळके, ग्रेस यांच्याबरोबर तुकाराम महाराज, हिंदी कविता- शायरी- गीतेही त्या उद्धृत करतात. काही ठिकाणी स्वतःच्याही कविता सांगतात. हे कवीमन पुस्तक प्रेमाने ओथंबून वाहणारंही आहे. याचा उत्तम दाखला अच्युत गोडबोले यांच्यावरील लेखात सापडतो; मात्र काही पुस्तकांची नावं द्यायला त्या विसरतात. ती पुस्तकं कोणती, याची एक हुरहुर वाटत राहते.

लेखिका ‘स्व’चा शोधही घेते. ‘गिधाड’ नावाच्या लेखामुळे वाचक सुन्न होऊन जातो; तर ‘पैलतीर’सारख्या लेखातून लेखिका ईश्वरवादाकडून निरीश्वरवादाकडे प्रवास करताना दिसते. विशेषतः चार्वाकदर्शनाने त्या अंतर्बाह्य घुसळून निघतात. लेखिकेचा हा प्रवासही या लेखमालेत आपल्याला समांतर भेटत राहतो. ललित लेखांच्या बरोबरच लेखिका काही निबंधात्मक लेखही सादर करते.

मराठी भाषा, टेक्नोसॅव्ही तंत्रज्ञान, शॉपिंग मॉल, एक्झिट हाऊस, आवाज की दुनिया, संस्कृतीची लस, युथनेशिया, भीती, क्रौर्य, द्रौपदी ते निर्भया अशा लेखांतून लेखिका त्या त्या विषयांचा ऊहापोह करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते; परंतु तिथे व्यासंग, अभ्यास, अवलोकन, निरीक्षण, विश्लेषण, बहुश्रूतपणा कमी पडतो आणि ते लेख, तो विषय माहितीपूर्ण न होता वरवरचा होतो.

मॉल आणि मुलांचं जग, मॉल आणखी कोपऱ्यावरचा वाणी, शॉपिंगहॉलिक बनवली गेलेली माणसं, आवाज की दुनिया असे लेख ललित शैलीत अधिक सरस झाले असते. ते निबंधाच्या अंगाने गेल्याने चांगला विषय वाया गेल्यासारखं वाटत राहतं. विशिष्ट व्यक्तीचा संदर्भ नसलेला लेख म्हणजे, ‘आठवणीतली शाळा’ उत्तम उतरला आहे.

त्यात सादर केलेल्या ‘आठवणीतल्या कविता’ म्हणजे गतस्मृतींना दिलेला एक वेगळा प्रयोग असतो. आठवणी अशाही सादर करता येतात याचा प्रत्यय त्यातून प्राप्त होतो. ‘अस्वस्थ मनाचे पडघम’ हे वाचनीय पुस्तक आहे. ते वाचून वाचकालाही एक वेगळी दृष्टी मिळू शकते. ती प्राप्त होणं हेच या पुस्तकाचं श्रेय ठरेल.

पुस्तक : अस्वस्थ मनाचे पडघम

लेखिका : विद्या निकम

प्रकाशक : अष्टगंध प्रकाशन

पाने : १२५

मूल्य : २५० रुपये

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.