मुंबईत नुकताच ‘मेटा’मध्ये पारितोषिकं मिळवलेल्या चार उत्तम नाटकांचा महोत्सव भरवण्यात आला होता. त्यात सादर झालेलं ‘रघुनाथ’ हे आसामी नाटक एक जबरदस्त, विलक्षण नाट्यानुभव देणारं होतं. ‘रघुनाथ’ने सहा महत्त्वाची पारितोषिकं पटकावली आहेत. समूह नाटकात व्यक्तिगत अभिनयाला फारसा वाव नसतो; पण त्या समजाला ‘रघुनाथ’ धक्का देतं...
भारतीय रंगभूमीच्या जगतात जसं आदित्य बिर्ला उद्योगसमूहातर्फे ‘आद्यम’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर चांगली नाटकं येतात, त्याचप्रमाणे महिंद्रा उद्योगसमूहातर्फे असे प्रयत्न गेली वीस वर्षे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे Mahindra Excellence in Theatre Awards (META). या वार्षिक बहुभाषिक नाट्यस्पर्धेत बंगाली, आसामी, हिंदी, मराठी, मल्याळी वगैरे भारतीय भाषांतील नाटकं असतात. या स्पर्धेत दरवर्षी १३ वेगवेगळी पारितोषिकं दिली जातात.
अलीकडे मुंबईत गेल्या काही वर्षांत ‘मेटा’त पारितोषिकं मिळवलेल्या चार उत्तम नाटकांचा महोत्सव भरवण्यात आला होता. त्यासाठी एनसीपीए आणि ‘मेटा’ प्रथमच एकत्र आले. त्यामुळे हा चार नाटकांचा महोत्सव एनसीपीएला होता. त्यात ‘अंधायुग’ (हिंदी), ‘अगरबत्ती’ (हिंदी-बुंदेली), ‘रघुनाथ’ (आसामी), ‘डू यू नो धीस साँग’ (इंग्लिश-हिंदी) ही नाटकं मंचित झाली. मी त्यातील ‘रघुनाथ’ हे आसामी नाटक बघितलं.
आजकाल एनसीपीएमध्ये भारतीय भाषांतील नाटकांना इंग्रजीत उपशीर्षकं (सब-टायटल्स) देतात. त्यामुळे भारतीय भाषांतील नाटकं बघणं शक्य झालं आहे. भारतीयांना एकुणात ईशान्य भारतातील घटनांबद्दल, तेथील कलेबद्दल आणि लोकजीवनाबद्दल फारसं माहिती नसतं. म्हणून मी ‘रघुनाथ’ बघायचं ठरवलं आणि एक जबरदस्त, विलक्षण नाट्यानुभव पदरी पडला.
‘मेटा’च्या १९व्या वर्षीच्या स्पर्धेत ‘रघुनाथ’ नाटकाने सहा महत्त्वाची पारितोषिकं पटकावली! उत्तम नाटक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम संहिता, उत्तम अभिनय, उत्तम निर्मिती आणि उत्तम नेपथ्य. सुमारे दीड तास चालणाऱ्या या नाटकाचे कथानक तसे अगदी साधे आहे. ईशान्य भारतातल्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्यासारखे. रघुनाथ आणि जानकी या गरीब दाम्पत्याला दहा वर्षांची शाळेत जाणारी एकुलती एक मुलगी असते. आसाममधील एक टिपिकल गाव. प्राथमिक शाळासुद्धा नसलेल्या या गावातला रघुनाथ ‘मुलीला शिकवायचं’ या ईष्येने तिला शेजारच्या गावातल्या शाळेत घालतो.
अशा प्रकारे एका गावातून दुसऱ्या गावात शिकायला जाणारी ती एकमेव मुलगी असते. त्यासाठी तिला दररोज नावेत बसून भलीथोरली नदी ओलांडावी लागते. दररोज तिच्या सोबतीला गावकरी असतात. गावात नदीवर मोठा पूल बांधण्याचं काम सुरू झालेलं असतं. आजही नदीच्या पलीकडे शाळा, बाजारहाट करण्यासाठी नावेत बसून नदी ओलांडावी लागते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा नदीला मोठा पूर येतो. भर पावसात गावकऱ्यांबरोबर रघुनाथची मुलगी शाळेला निघते; पण मध्य प्रवाहात नाव उलटते.
त्यात अनेक गावकऱ्यांबरोबर रघुनाथची मुलगीसुद्धा बुडून मरते. त्या प्रसंगीचा रघुनाथ-जानकीचा विलाप बघवत नाही. आपली मुलगी ज्या प्रकारे गेली तसं पुन्हा गावात होऊ नये म्हणून रघुनाथ एक खोटी कथा रचतो. तो गावकऱ्यांना सांगतो, की त्याला त्याच्या घरामागच्या तळ्यात देवाची एक प्राचीन मूर्ती सापडली आहे. अशा प्रकारे ही बातमी जर सर्वत्र पसरली तर टीव्ही पत्रकार येतील, मग ही बातमी सर्वत्र पसरेल. नंतर जागं झालेलं सरकार पुलाचं काम जोरात सुरू करेल... या नाटकात स्त्रीशिक्षण, ईशान्य भारतातील विकास वगैरे मुद्द्यांना सफाईने; पण ओझरता स्पर्श केला गेला आहे.
‘रघुनाथ’चं कथानक एका सत्यघटनेवर आधारलेलं आहे. नाटकाची प्रगती, जडणघडण एका कार्यशाळेत झाली आहे. कार्यशाळेतल्या शिबिरार्थींना वृत्तपत्रं वाचायला सांगितलं जातं आणि अशी एखादी घटना शोधा ज्याच्यावर नाटक करता येईल, अशी सूचना केली जाते. वर्तमानपत्रात एक बातमी होती, की शाळेत जाणारी मुलगी नावेत बसून नदी ओलांडताना बुडून मरण पावली.
आसाममधील नद्यांना नेहमी पूर येत असतात. सरकार मदत पाठवते; पण राजकारणी आणि नोकरशहा त्यात भ्रष्टाचार करतात. ही घटना समोर ठेवून नाटक बसवलं गेलंय. माणसं दुःखाने त्रस्त होतात; पण मोडून पडत नाहीत. रघुनाथसुद्धा नंतर मुलीच्या मृत्यूचं दुःख बाजूला ठेवतो आणि आपल्या खेड्याच्या विकासाची स्वप्नं बघतो. हेमिंग्वेच्या ‘द ओल्ड मॅन ॲण्ड द सी’ या कादंबरीतील म्हातारा म्हणतो तसं, a man can be destroyed but cannot be defeated... या नाटकात एका वेगळ्या नैतिक प्रश्नाला हात घालण्यात आला आहे. रघुनाथ खोटं बोलतो, की त्याला स्वप्नात घरामागची मूर्ती दिसली आणि आता तेथे मंदिर बांधायचं आहे. अशा खोट्या स्वप्नातून ‘गावाचा विकास’ ही चांगली गोष्ट साधता येईल का? साधावी का? ‘रघुनाथ’ असे गुंतागुंतीचे प्रश्न प्रेक्षकांसमोर ठेवतो.
‘मेटा’ स्पर्धेत भाग घेण्याचं ठरलं तोपर्यंत ‘रघुनाथ’ची संहितासुद्धा तयार नव्हती. नाटकाचा दिग्दर्शक विद्युत कुमार नाथ (वय ३५) हा तरुण
रंगकर्मी आहे. आजपर्यंत त्याने सुमारे पन्नास नाटकांत भूमिका केल्या आहेत, आठ नाटकं दिग्दर्शित केली आहेत आणि पाच नाटकं लिहिली आहेत. त्याने ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा- सिक्कीम थिएटर ट्रेनिंग सेंटर’मधून प्रशिक्षण घेतलं आहे. विद्युत कुमार नाथला या नाटकाची निर्मिती करताना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागलं. पहिली आणि नेहमीची मोठी अडचण म्हणजे आर्थिक. त्याने फेसबुकवर आवाहन केलं. एका व्यक्तीने
दहा हजारांची देणगी दिली तर दुसऱ्याने चार हजार दिले. बघता बघता चाळीस हजार जमा झाले. लॉकडाऊन उठल्यावर ऑगस्ट २०२२ मध्ये या
नाटकावर काम सुरू झालं. नाटकाची निर्मिती ‘अभिमुख’ या आसाममधल्या नागाव येथील नाट्यसंस्थेने केली आहे. मी या नाटकाचा प्रयोग एनसीपीएत बघितला. दिग्दर्शक नाथ याने नाटकाचे सर्व घटक व्यवस्थित वापरले. नाटकाच्या प्रकाश योजनेचा तर खास उल्लेख करावा लागेल. फार दिवसांनी इतकी कल्पक प्रकाश योजना (गौतम सैकिया) बघायला मिळाली. चांगल्या नाटकात प्रकाश योजना जर कल्पक असली तर प्रयोग किती प्रभावी होतो याचे उदाहरण म्हणून ‘रघुनाथ’च्या प्रकाश योजनेचा उल्लेख करता येईल.
प्रकाश योजनेप्रमाणेच या नाटकाचे नेपथ्य अप्रतिम होते. ‘बांबूची शेती’ हा आसामच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नेपथ्य म्हणून रंगमंचावर फक्त बांबूच्या मोठ्या शिडीसारखी एक बहुउपयोगी वास्तू होती. त्यातून उंच पर्वत, एकमेकांना मदत करत पूल बांधण्याचं काम करणारे गावकरी, होडीत बसलेले प्रवासी आणि शाळेत जाणारी रघुनाथची मुलगी, पुरात उलटलेली होडी आणि तेव्हा जिवाच्या आकांताने ओरडणारे प्रवासी वगैरे सर्व प्रसंग वठवले आहेत. नाटक सुरू होतं तेव्हा दिग्दर्शक या नेपथ्याचा इतका वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेईल याचा अंदाजसुद्धा आला नाही.
‘प्रायोगिक रंगभूमीच्या कक्षा रुंदावणारं नेपथ्य’ असं याचं वर्णन करावं लागतं. हे समूह नाटक असल्यामुळे असंख्य गावकरी, त्यांचे परस्परसंबंध, रघुनाथ-जानकी, त्यांची मुलगी, रघुनाथच्या स्वप्नातल्या देवळावर स्टोरी करायला आलेले पत्रकार वगैरेंच्या लयबद्ध आणि नृत्यसदृश हालचाली (हिमांग्शू देवरी आणि विद्युतकुमार नाथ) बघताना मला पन्नास वर्षांपूर्वी पुण्यात बघितलेला ‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग आठवत होता. ‘रघुनाथ’ने तसाच खिळवून टाकणारा प्रसन्न अनुभव दिला.
अशा समूह नाटकात व्यक्तिगत अभिनयाला फारसा वाव नसतो, या समजाला विद्युतकुमार नाथने सादर केलेला ‘रघुनाथ’ धक्का देतो. येथे मला
पुन्हा एकदा ‘घाशीराम कोतवाल’मध्ये डॉ. मोहन आगाशेंनी अजरामर केलेला ‘नाना फडणवीस’ आठवत होता. एक नवं नाटक बघताना पन्नास
वर्षांपूर्वीचं नाटक आठवावं, हा अनुभव माझ्यासाठीसुद्धा अभूतपूर्व होता. विद्युतकुमार नाथच्या ‘रघुनाथ’ला तितकीच योग्य साथ दिली त्याच्या पत्नीने म्हणजे जानकीच्या भूमिकेतील जुत्रिश्ना गोहेन यांनी. या दोघांनी आसामातील एका खेड्यातल्या गरीब पती-पत्नीचं कुटुंब जातिवंत अभिनयाने
जिवंत केलं. वर उल्लेख केल्याप्रमाणे ‘रघुनाथ’ला उपशीर्षकं होती; पण नसती तर फार बिघडलं नसतं, असं वाटावं इतकं ते जबरदस्त नाटक आहे. मला ते बघताना ‘घाशीराम कोतवाल’प्रमाणे मणिरत्नमचा ‘रोजा’ आठवत होता. या सिनेमात ‘माझ्या नवऱ्याला दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवा’ अशी विनंती करण्यासाठी मधू एका ज्येष्ठ मंत्र्यांना भेटते. त्यांना मधूची भाषा समजत नाही. एक गृहस्थ दुभाष्या म्हणून पुढे येतो. ते मंत्री म्हणतात, ‘दुभाष्याची गरज नाही.
ती काय बोलते हे मला समजतंय’... तसं मला ‘रघुनाथ’ बघताना वाटत होतं, की उपशीर्षकांची काही गरज नाही. मला रघुनाथचं, त्याच्या पत्नीचं, गावकऱ्याचं दुःख समजतंय. ही दर्जेदार कलेची पहिली अट आहे. अशी कलाकृती भाषा- धर्म- संस्कृती वगैरे सर्व प्रकारचे अडथळे पार करत रसिकांना भेटते. म्हणूनच पाच-सहा शतकांपूर्वी इंग्लंडमध्ये लिहिलेली शेक्सपियरची नाटकं आज २०२४ मध्येसुद्धा आपल्याला भिडतात.
(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलासंस्कृतीच्या घडामोडींचे अभ्यासक, राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आणि कादंबरीकार आहेत.)