भारत ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावाच हिरो ठरला तो नितीश कुमार रेड्डी.. शतकी खेळी करत भारताला संकटातून काढलं तसेच ऑस्ट्रेलियाला दणका दिला आहे. नितीश कुमार रेड्डीने 171 चेंडूत शतक पूर्ण केलं आहे. शेवटची विकेट हाती असताना नितीश कुमार रेड्डीचं शतक पूर्ण होते की नाही याबाबत क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढत होती. जसप्रीत बुमराह बाद झाल्यानंतर धाकधूक आणखी वाढली. पण नितीश कुमार रेड्डीला स्ट्राईक मिळाली आणि बोलँडला चौकार मारत शतक पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियात शतकी खेळी करणारा तिसरा तरूण फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत नंतर त्याने कमी वयात अशी कामगिरी केली आहे. 21 वर्षे आणि 216 दिवसांचा असताना शतक ठोकलं आहे.फक्त दोन खेळाडूंनी आठव्या किंवा रेड्डीपेक्षा कमी वयात फलंदाजी करत शतके झळकावली आहेत. अबुल हसन (20 वर्षे 108 दिवस) आणि अजय रात्रा (20 वर्षे 150 दिवस) यांच्यानंतर रेड्डीचा नंबर येतो.
तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबला तेव्हा भारताने 9 गडी गमवून 358 धावा केल्या होत्या. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 116 धावांची आघाडी आहे. नितीश कुमार रेड्डीने नाबाद 105, तर मोहम्मद सिराज नाबाद 2 धावांवर खेळत आहे. मेलबर्न कसोटी सकाळच्या पहिल्या सत्रात पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात होता. पण नितीश कुमार रेड्डीने सर्व गोष्टींवर पाणी टाकलं. आठव्या विकेटसाठी नितीश कुमार रेड्डीने वॉशिंग्टन सुंदर सोबत चांगली भागीदारी केली आणि भारतीय क्रीडाप्रेमींच्या जीवात जीव आला.
नितीश कुमार रेड्डी याने शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला आहे. आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर खेळताना ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठव्या क्रमांकावर खेळताना शतक करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी ऋद्धिमान साहाने हा पराक्रम केला होता. पण भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती.
191 धावांवर ऋषभ पंतची विकेट पडल्यानंतर नितीश कुमार रेड्डी मैदानात उतरला होता. ऑस्ट्रेलियाकडे 283 धावांची आघाडी होती. पण ही आघाडी आपल्या शतकी खेळीने आणि वॉशिंग्टन सुंदरसोबत केलेल्या भागीदारीने कमी केली. आता ऑस्ट्रेलियाकडे 116 धावांची आघाडी असून तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. एक विकेट हाती असून रविवारी यात आणखी घट होऊ शकते.