Kalyan Crime Update : उज्ज्वल निकम लढणार कल्याणमधील निर्भया केस, 30 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Kalyan Crime Update : कल्याण पूर्वेतील एका 12 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्वरीत आणि कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. उज्ज्वल निकम हे या खटल्याची बाजू मांडणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "पीडित मुलगी मला माझ्या मुलगीसारखीच वाटते. तिला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. दोषींना 4 महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल," अशी ग्वाही त्यांनी दिली.
शनिवारी पीडित मुलीच्या पालकांसह मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा आणि कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी, कुटुंबीयांनी आपल्या व्यथा मांडल्या आणि न्याय मिळावा अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले निर्देशमुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारची असुरक्षितता वाटू नये, याबाबतही निर्देश दिले. ते म्हणाले, "कुटुंबाला घाबरण्याची गरज नाही. जर त्यांना कोणी त्रास दिला, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. गुन्हेगार यापुढे तुरुंगातून बाहेर येणार नाहीत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल."
न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊलया बैठकीनंतर, अमरजीत मिश्रा यांनी सांगितले, "ही बाब केवळ एका कुटुंबाची नाही, तर मुलींच्या सुरक्षिततेची आणि न्यायाची आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या अनुभवी वकिलाची मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली आणि ३० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले, हे न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे."
तसेच, अमरजीत मिश्रा यांनी पीडित कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी विजय उपाध्याय, आयपी मिश्रा, सीपी मिश्रा आदीही उपस्थित होते.