: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराहने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कांगारू संघाचे फलंदाज बुमराहच्या चेंडूंचा सामना करताना संघर्ष करताना दिसत आहेत. मेलबर्न स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या सामन्यात बुमराहने कांगारू संघाचा सलामीवीर सॅम कोन्स्टासला बाद करत इतिहास रचला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देवचा विक्रम मोडला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला
बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहने त्याच्या इनस्विंग बॉलने सॅम कॉन्स्टासला बोल्ड केले. यासह तो ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज बनला. बुमराहच्या आधी हा विक्रम कपिल देवच्या नावावर होता ज्यांनी 1991-92 मध्ये झालेल्या मालिकेत एकूण 25 विकेट घेतल्या होत्या. बुमराहने या मालिकेत आतापर्यंत 28 विकेट्स घेतल्या आहेत. याआधी 2018-19 मध्ये जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा तो हा विक्रम मोडण्यापासून फक्त 5 विकेट दूर होता, पण यावेळी तो हा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरला.
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज
- जसप्रीत बुमराह - आतापर्यंत 28 विकेट (2024-25)
- कपिल देव - 25 विकेट (वर्ष 1991-92)
- जसप्रीत बुमराह - 21 विकेट (2018-19)
- मनोज प्रभाकर - 19 विकेट (वर्ष 1991-92)
बुमराहची 2024 सालातील कामगिरी
जसप्रीत बुमराह वर्ष 2024 मध्ये आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 15.32 च्या सरासरीने 68 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर इंग्लंडच्या गुस एटिनसनचे नाव आहे, त्याने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 52 विकेट घेतल्या आहेत.