संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात वातावरण तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. इतकंच नव्हे तर भाजप आमदार सुरेश धस यांनीही थेट मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. तर वाल्मीक कराडला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येतेय. या हत्या प्रकरणात पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. आतापर्यंत दीडशे जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. आरोपींचा सीडीआर डेटा तपासण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचा डेटाही रिकव्हर केला जात आहे.
सीआयडीची एकूण ९ पथके या हत्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोपी आणि नातेवाईकांची चौकशी करत असतानाच त्यांची सर्व खाती गोठवण्यात आली आहेत. मात्र जप्तीची कारवाई अद्याप करण्यात आली नाहीय. मालमत्ता जप्त करण्याबाबत अद्याप न्यायालयाचे आदेश नाहीत. त्यामुळे अशी कारवाई केली नसल्याची माहिती समजते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची खाती गोठवली जाणार आहेत. दिवसभऱात तब्बल २५ जणांची चौकशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली होती. या गाडीत दोन मोबाईल सापडले होते. या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे व्हिडीओ असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात येत असून त्याचा रिपोर्ट ५ दिवसात येण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आतापर्यंत जवळपास दीडशे जणांची चौकशी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या खात्यांची संख्या तीन आकडी आहे. पॅन कार्ड, आधारा कार्ड यांच्याशी जोडलेल्या खात्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात जी जी माहिती मिळेल ती ती माहिती न्यायालयात दिली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय.