यशस्वी जयस्वालच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा टीम इंडियाला बसला मोठा फटका, रोहित शर्माही भडकला
GH News December 29, 2024 02:08 PM

तिसऱ्या दिवशी नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीमुळे टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. जसप्रीत बुमराहने पहिल्या सत्रात चार, तर मोहम्मद सिराजने दोन गडी बाद केले. आधीच ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची आघाडी होती. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान होतं. पण यशस्वी जयस्वाल कॅच पकडताना चाचपडताना दिसला. त्याच्या चुकीचा फटका संपूर्ण संघाला भरावा लागला. त्याने ही चूक एकदा दोनदा नाही तर तीनदा केली. त्याच्या या चुकीमुळे कर्णधार रोहित शर्माही वैतागलेला दिसला.

तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाचा झेल सोडला. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. उस्मान ख्वाजा 8 चेंडूंचा सामना करत 2 धावांवर होता. त्यानंतर उस्मान ख्वाजाने 21 धावा केल्या. म्हणजेच 19 धावांचा फटका टीम इंडियाला बसला. 40 वं षटक टाकण्यासाठी रोहित शर्माने आकाश दीपला चेंडू सोपवला होता. मार्नस लाबुशेन 46 धावांवर खेळत होता. आकाशदीपच्या चेंडूवर सोपा झेल सोडला. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. मार्नस लाबुशेनने त्यानंतर 70 धावांची खेळी केली म्हणजेच 24 धावांचा फटका बसला.

इथपर्यंत सर्व काही माफ केलं. पण त्याच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका टीम इंडियाला बसला. पॅट कमिन्सचा सोपा झेलही सोडला. एकीकडे विकेट गरज असताना चुका करत राहिला. 49 व्या षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा आला होता. पण तेव्हा पॅट कमिन्स 21 धावांवर खेळत होता. तेव्हाही जयस्वालने झेल सोडला.

यशस्वी जयस्वालचा हलगर्जीपणा वारंवार अधोरेखित होताना दिसत आहे. फलंदाजीतही रन नसताना धाव घेत सुटला आणि विकेट देऊन बसला. खरं तर कसोटीत संयम खूपच महत्त्वाचा असतो. पण संयम जराही नसून चोरट्या धावा घेण्याच्या नादात विकेट देऊन बसला. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजीत लय तुटली. त्यानंतर तीन झेल सोडून टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलण्यात हातभार लावला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.