Crime News : दुचाकीसाठी 9 दिवसांचं बाळ विकलं, आई म्हणते, मी बाळाला...
esakal December 29, 2024 11:45 PM

पैशाच्या हव्यासापोटी पोटच्या लेकरांना विकल्याच्या घटना याआधी अनेकदा समोर आल्या आहेत. आता दुचाकी खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यानं ९ दिवसांच्या चिमुकल्याला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातल्या बस्ता परिसरात ही घटना घडलीय. मयूरभंज जिल्ह्यातल्या सैनकुला गावातल्या दाम्पत्याला अपत्य नव्हतं. त्यांना ६० हजार रुपयांमध्ये बाळ विकल्याचा आरोप आहे. दरम्यान, दाम्पत्याने असा दावा केला आहे की, गरीबी आणि मुलाचं पालन-पोषण करणं शक्य नसल्यानं बाळ दान केलं होतं.

पोलीस आणि बाल कल्याण समितीच्या पथकाने कारवाई करत बाळाला दाम्पत्याकडून ताब्यात घेतलं. बाळ घेणाऱ्या दाम्पत्याने सांगितलं की, काहीही पैसे न घेता बाळाला घेतलं होतं. यात काहीच व्यवहार झालेला नाही. तर बाळाच्या आई-वडिलांनीही दावा केला की आम्ही बाळाच्या बदल्यात काही पैसे घेतलेले नाहीत.

बाळाच्या आई-वडिलांनी दावे केल्यानंतरही त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत की, ६० हजार रुपयांमध्ये बाळाची विक्री केली आहे. यातील काही पैशांचा वापर करून वडिलांनी दुचाकीही खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतोय. बाळाच्या आईने मात्र हे आरोप फेटाळून लावले. मी एका बाळाला जन्म दिला पण गरीबीमुळे त्याचा सांभाळ करू शकत नाही असं आईने म्हटलं.

बाळाची आई म्हणाली की, मी एका अपत्य नसलेल्या दाम्पत्याला बाळ दिलं. मी माझं बाळ विकलं नाही असं आईने सांगितलं. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन्ही कुटुंबांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. अधिकारी या प्रकरणी सत्य शोधण्यासाठी आणि मुलाच्या भविष्यासाठी आता अधिक तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.