Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; वाल्मीक कराडसह ४ आरोपींचे बँक खाते गोठवलं
Saam TV December 30, 2024 02:45 AM

बीड : मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने मोठी कारवाई केली आहे. बीडमधील खंडणी आणि हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या प्रकरणात सीआयडीने वाल्मीक कराडसह ४ आरोपींचे बँक खाते गोठवल्याची माहिती हाती आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमधून आता सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरु केला आहे. बीडमधील खंडणी आणि हत्या प्रकरणातील फरार आरोपींसाठी सीआयडीच्या ९ पथकांकडून तपास सुरु आहे. जवळपास दीडशे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून तपास सुरू आहे.

याच प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून फरार वाल्मीक कराडसह चारही आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आलं आहे. त्यांच्या पासपोर्टविषयी देखील कारवाई करण्यात आली आहे. या चौघांचा राज्यासह देशभरात तपास सुरू आहे. त्यामुळे लवकरच पोलीस या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षांची ८ तास चौकशी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. बारा वाजता चौकशीसाठी आलेल्या संध्या सोनवणे या सव्वा आठ वाजता पोलीस ठाण्याच्या बाहेर निघाल्या. या चौकशीनंतर राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे म्हणाल्या, 'मला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांनी जी प्रश्न केली, मी त्यांना उत्तर दिलं. यानंतरही चौकशीसाठी बोलावलं तर मी येईल. मला फोन आला होता. तुम्हाला चौकशीसाठी यावं लागतंय, त्यामुळे मी आले. आज दिवसभरात जवळपास 40 पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी झाली करण्यात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.